गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार अशोक नेते निवडून आलेत. संसदेत प्रवेश करताना त्यांच्यासमोर या मतदार संघातील प्रचंड विकास कामाचे आव्हान आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे सगळ्यात मोठे काम आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या अखत्यारित येणार्या वनकायद्यामुळे रखडलेले गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याचे महत्वाचे काम करावयाचे आहे. गेल्या एक तपापासून सिरोंचा तालुक्यात राष्टÑीय महामार्ग क्रमांक १६ चे काम रखडलेले आहे. हे कामही मार्गी लावून सध्या सुरू असलेले गोदावरी नदीवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासोबत अन्य दोन मोठे पूलही या तालुक्यात उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. जिल्ह्यात नवे उद्योग सुरू करण्याबाबतही नव्या खासदारांनी प्रयत्न करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे. भाजपने निवडणुकीच्या काळात पक्षाचे माजी राष्टÑीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला विकासाचे मोठे आश्वासन दिले आहे. त्या आश्वासनाची पूर्तता येणार्या काळात भाजपला करावी लागेल. गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालणा देण्यासाठी एमआयडीसी परिसरात विमानतळ तयार करू, असे आश्वासन गडचिरोलीच्या सभेत जनतेला दिले होते. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजप खासदारासमोर आव्हानांची यादीच
By admin | Published: May 18, 2014 11:34 PM