बायोमेट्रिक प्रणालीचा उडताेय फज्जा
भामरागड : शासनाने कर्मचाऱ्यांच्या नियमित हजेरीकरिता अनेक कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविलेल्या आहे. भामरागडातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोडले तर बºयाच कार्यालयात ही बायोमेट्रिक मशीन बंद पडलेली आहे.
लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाढला धोका
आलापल्ली : शहरातील मुख्य परिसर तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्षच आहे.
आरोग्य केंद्रात राहणे सक्तीचे करा
देसाईगंज : प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात निवासस्थाने बांधून देण्यात आली आहेत. मात्र बहुतांश डॉक्टर व परिचारिका निवासस्थानांमध्ये राहत नाही. त्यांना राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे.
अनेक पांदण रस्त्यांवर अतिक्रमणाचा विळखा
जोगीसाखरा : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. जोगीसाखरा परिसरातील पळसगाव, रामपूर, कासवी आदी गावातील शेतींकडे जाणाऱ्या अनेक पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.
कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.
चपराळा पर्यटनस्थळाच्या सुविधांकडे लक्ष द्या
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र याठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा.
मामा तलावांमधील अतिक्रमण कायमच
आरमोरी : अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गडचिरोली शहरातील गोकुलनगर लगतच्या तलावात अतिक्रमणधारकांनी पक्की घरे बांधली आहेत.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांचा संपर्क आहे.
भाकरोंडी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
भाकरोंडी : परिसरातील अनेक गावातील रस्त्यांचे २० वर्षांपूर्वी बांधकाम करून डांबरीकरण करण्यात आले. परंतु सदर मार्गाची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आवागमन करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे.
शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ
भामरागड : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही.