एकच होती रिक्त जागा : १० शिक्षक झाले उपस्थितगडचिरोली : खासगी संस्थांच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात राबविण्यात आली. मात्र यादरम्यान एकाही शिक्षकाचे समायोजन झाले नाही. त्यामुळे या सर्व शिक्षकांना विभागीयस्तरावरील समायोजनासाठी जावे लागणार आहे. खासगी संस्थांच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळांमधील १० शिक्षक अतिरिक्त ठरले होते. तर जिल्हाभरात केवळ एकच जागा रिक्त होती. सदर रिक्त असलेली जागा ६ ते ८ या वर्गाची गणित या अध्यापन पद्धतीची होती. सदर विषय शिकविण्यासाठी शिक्षकाची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी विज्ञान व पदवीधर असणे आवश्यक आहे. अतिरिक्त ठरलेल्या १० शिक्षकांपैकी एकही शिक्षक १२ वी विज्ञान नसल्याने त्यांचे समायोजन झाले नाही. जिल्हास्तरावर समायोजन करण्याच्या प्रक्रियेतील तीन फेऱ्या घेण्यात आल्या. या तिन्ही फेऱ्यांमध्ये रिक्त असलेल्या जागेसाठी एकही शिक्षक पात्र असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे एकाही शिक्षकाचे समायोजन झाले नाही. या सर्व शिक्षकांच्या समायोजनासाठी आता विभागीय स्तरावरील चवथी फेरी घेतली जाणार आहे. सदर समायोजन प्रक्रियेच्या वेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी एन. एस. चावरे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रफुल मेश्राम, बी. जे. अजमेरा, साई कोंडावार, खुशाल शेडमेके, प्रभाकर ठाकरे, मधुकर दोनाडकर, गुणवंत धात्रक यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)माध्यमिकची प्रक्रिया रखडलीखासगी संस्थांच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक शाळांमधील ११५ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांच्या समायोजनाची तारीखसुद्धा निश्चित झाली होती. मात्र यापैकी एका शिक्षकाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने समायोजनाच्या प्रक्रियेला जैसे थे स्थिती (स्टेथेस्को) ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे माध्यमिक विभागाची समायोजनाची प्रक्रिया ठप्प पडली आहे.
एकाही प्राथमिक शिक्षकाचे प्रक्रियेत समायोजन नाही
By admin | Published: September 13, 2016 12:57 AM