लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दोन दिवसांपूर्वी सरपण वेचण्यासाठी गेलेल्या इंदिरानगरातील महिलेवर हल्ला करून ठार करणाऱ्या वाघाचा ठावठिकाणा अद्यापही लागला नाही. दरम्यान त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करत कर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने वनाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. तसेच मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना सांत्वनपर आर्थिक मदत दिली.शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी या घटनेची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री संजय राठोड यांना दिली. त्यांनी शासनाकडून भरीव मदत देण्याचे आश्वासन देऊन वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला सूचना देणार असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षकांची भेट घेतली. त्यावेळी अरविंद कात्रटवार यांच्यासह जिल्हा संघटक विलास कोडप, गजानन नैताम, यादव लोहबरे, ज्ञानेश्वर बागमरे, संजय बोबाटे आदी अनेक जण उपस्थित होते.
बंदोबस्त करा- डॉ.होळीगडचिरोली शहरानजिक चांदाळा मार्गावर दोन दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात महिलेचा बळी गेला. काही दिवसांपूर्वी राजगाटा येथील एका इसमाला अशाच प्रकारे वाघाने ठार केले. चामोर्शी तालुक्यातही एका घरात घुसून बिबट्याने महिलेचा बळी घेतला. या घटनांमुळे शेतात काम करणाऱ्या आणि फिरायला जाणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या वाघांचा वन विभागाने बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त वातावरण द्यावे, अशी मागणी आमदार डॉ.देवराव होळी यांनी केली आहे.