आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत सुरळीत विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे लाईनमनची मागणी आहे.
शासकीय कार्यालये अस्वच्छतेच्या गर्तेत
गडचिरोली : शहरातील अनेक कार्यालयाच्या इमारतींच्या परिसरात सर्वत्र अस्वच्छता आहे़ मागच्या बाजूने कच्चा रस्ता असून त्यावर घाण, कचरा साठून असतो़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे़ विशेष करून शासकीय इमारतीच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणात घाण पसरली असल्याचे चित्र दिसून येते.
खुल्या जागांमधील अस्वच्छतेमुळे दुर्गंधीत वाढ
गडचिरोली : न. प. प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून वाॅर्डा-वाॅर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने या ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात आहे. ओपन स्पेसची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले
चामोर्शी : तालुक्याच्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. सदर ढिगाऱ्यांमुळे वादळवारा आल्यास तो रस्त्यावर येतो व तेथील काडीकचरा पादचारी तसेच वाहनधारकांच्या डोळ्यात जातो. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रा.पं. प्रशासनाने नाली स्वच्छतेच्या मोहिमेसोबत शेणखताचे ढिगाऱ्यांची इतरत्र व्यवस्था करावी.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
धानोरा : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रामंचायत प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत. शासनाने योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
विद्युत तारांना खेटून इमारतींचे बांधकाम
गडचिरोली : शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत तारांच्या अगदी जवळून इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याकडे नगर परिषदेचे मात्र दुर्लक्ष होत आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
गडचिरोली: गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कत्तलीसाठी जात असलेले जनावर पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावे लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी आहे. गोरक्षण संस्था निर्माण करण्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे.
मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी
धानोरा : जिल्ह्यात मधसंकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मधसंकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे.
गोकुलनगर तलावाचे सौंदर्यीकरण अर्धवट
गडचिरोली : गोकुलनगर लगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. त्यामुळे या तलावात आता अतिक्रमण वाढले असून अस्वच्छता आहे.
अंगारा येथील टॉवरची रेंज वाढवा
धानोरा : अंगारा येथील टॉवरची रेंज वाढवावी, अशी मागणी पं. स. सदस्य विलास हावडे यांनी केली आहे. अंगारा परिसरात मुस्का, खडकी, नवेझरी, तुलतुली, खांबाडा आदी गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमध्ये रेंज पोहोचत नाही. त्यामुळे येथील टॉवरची रेंज वाढवावी, अशी मागणी पं. स. सदस्यांनी केली आहे.
शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा
अहेरी : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड पडून असल्याचे दिसत आहे.
खुल्या जागांची दैनावस्था कायम
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात अनेक वार्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न.प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा, करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
देसाईगंज : दिवसेंदिवस देसाईगंज शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगर परिषदेकडे केली आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.
पुलाचे बांधकाम करण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. मात्र या भागाच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. या भागात अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे.