बॅलेटवर बुलेट भारी : कुरखेडा, धानोरा तालुक्यातील २३ जागा रिक्त राहणारगडचिरोली : राज्य निवडणूक आयोगाने २७ आॅक्टोबर २०१४ रोजी राज्यभरासह गडचिरोली जिल्ह्यातील डिसेंबर २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक विभागाने या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. मात्र अखेरच्या दिवशीपर्यंत म्हणजे ८ नोव्हेंबरपर्यंत धानोरा तालुक्यातील एकमेव कोंदावाही या सार्वत्रिक व कुरखेडा तालुक्यातील आठ ग्रा. पं. च्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन अर्ज प्राप्त झाले नसल्याने या ग्रा. पं. तील २३ जागा रिक्त राहणार आहेत. सदर ग्रा. पं. क्षेत्रात नक्षली दहशत असल्यामुळे ‘बॅलेटवर बुलेट भारी’ होत असल्याचे दिसून येत आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार धानोरा तालुक्यातील एकमेव कोंदावाही या ग्रा. पं. च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ७ जागांसाठी नामांकन अर्ज मागविण्यात आले होते. तर कुरखेडा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत १६ प्रभागामध्ये ३४ जागांसाठी नामांकन अर्ज मागविण्यात आले होते. पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कुरखेडा तालुक्यातील पुराडा, शिवणी, दादापूर, तळेगाव, धनेगाव, आंधळी (सोनसरी), घाटी, कातवाडा, रानवाई व खोब्रामेंढा आदींचा समावेश आहे. या ग्रा. पं. च्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा व ग्रामपंचायत प्रशासनाने जोरात तयारी सुरू केली होती. निवडणूक असलेल्या प्रभागातील नागरिकांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रमही प्रशासनाने सुरू केला आहे. जेणेकरून नव मतदार मतदानापासून वंचित राहू नये, हा उद्देश होता. कोंदावाही ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी नक्षली दहशतीमुळे एकही उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केला नाही. तसेच कुरखेडा तालुक्यातील दादापूर, तळेगाव, धनेगाव, आंधळी (सोनसरी), घाटी, कातवाडा, रानवाई व खोब्रामेंढा आदी ग्रा. पं. च्या १६ जागांसाठी नक्षली दहशतीमुळे एकही नामांकन अर्ज दाखल झाले नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे ९ ग्रामपंचायतीमध्ये २३ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार नाही. कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक ७ जागांसाठी होत आहे. ७ जागांसाठी १५ नामांकन अर्ज प्राप्त झाले असून छाननी अंती १५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीतील उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. २३ नोव्हेंबर रोजी निर्भय वातावरणात या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक घेण्यासाठी प्रशासनाने तयारी चालविली आहे. कुरखेडा तालुक्यातील शिवणी ग्रा. पं. च्या ५ जागांसाठी ६ नामांकन अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी एका उमेदवाराने आपले नामांकन अर्ज मागे घेतले. त्यामुळे ५ जागांसाठी ५ उमेदवार असल्याने या ठिकाणी अविरोध निवड पार पडली. विरोधात इतर उमेदवार नसल्याने नामांकन अर्ज भरलेले पाचही उमेदवार अविरोध निवडून आले. ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नक्षली दहशत वाढू लागली. यामुळे अनेक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले नाही. कुरखेडा व धानोरा तालुक्यात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी नामांकन अर्ज दाखल करण्याची हिम्मत दाखविली नाही. त्यामुळे प्रशासनाला एकमेव पुराडा ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी निवडणुका घोषित झाल्यापासून हिंसक कारवायांमध्ये वाढ केली होती. तसेच दुर्गम भागात या दोन्ही निवडणुकीतील उमेदवारांना प्रचार करण्यासाठी मज्जाव केला होता. त्यामुळे दुर्गम गावांमध्ये प्रचाराचा ज्वर फारच कमी होता. निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी दुर्गम भागात अनेक ठिकाणी बॅनर व पत्रके टाकून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रशासनासमोर नक्षल्यांचे मोठे आवाहन होते. मात्र सुरक्षा व्यवस्था वाढविल्याने निवडणुका पार पडल्या. (स्थानिक प्रतिनिधी)
नऊ ग्रा.पं.साठी नामांकनच नाही
By admin | Published: November 15, 2014 10:45 PM