एटापल्ली : काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना लस मिळत नव्हती. ऑनलाईन नाेंदणी करण्यासाठी अनेक अडचणी येत हाेत्या. शहरी भागासह ग्रामीण भागातही ही समस्या हाेती; परंतु दुर्गम तालुक्यांमध्ये वेगळीच स्थिती दिसून येत हाेती. अनेकांच्या घरी जाऊन लस घेण्याबाबत सांगितले जात हाेते. त्याला थाेडाफार प्रतिसाद मिळत हाेता. मात्र आता एटापल्लीसारख्या दुर्गम तालुक्यात ही स्थिती बदललेली दिसून येते. काेराेना प्रतिबंधक लस उपलब्ध असूनही तालुक्यातील नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीकरणाकडे पाठ फिरविली. त्यामुळे एटापल्ली ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र पाच दिवसांपूर्वी बंद करण्यात आले.
राेग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लस द्यावी, याकरिता शासन-प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत; परंतु एटापल्ली तालुक्यात लसीकरणाला नागरिकांकडून आवश्यक प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर ५ ते १० जून या पाच दिवसात दररोज लस घेणारे कमीत-कमी दहा जण येणे आवश्यक हाेते. परंतु तसा प्रतिसाद मिळाला नाही. वॅक्सिनची एक बाॅटल फाेडल्यानंतर १० जणांना लस द्यावी लागते. ही लस घेण्यासाठी येथील केंद्रावर १० च्या आत कमी लाेक लस घेण्यासाठी येत हाेते. परिणामी लस वाया जाण्याची शक्यता हाेती. त्यामुळे १० लाेक गाेळा झाल्यानंतरच लस द्यावी, असे निर्देश वरिष्ठांकडून आराेग्य कर्मचाऱ्यांना मिळाले हाेते. येथे लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या १० हाेईपर्यंत प्रतीक्षा केली जात हाेती. अनेकदा १० लाेक येत नव्हते. त्यामुळे आलेल्यांना परत पाठवावे लागत हाेते. फाेन करून परत बाेलाविले जाईल, असेही लाेकांना सांगितले जात हाेते. परंतु फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. पंधरवड्यात पाच ते सहा जण लस घेण्याकरिता येत हाेते. ही स्थिती लक्षात घेऊन पर्यायाने पाच दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आले. एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रात ४५ वर्षांवरील केवळ १ हजार ८९३ जणांनी लस घेतली. यात पहिला डोस १ हजार ४०७ तर दुसरा डोस ४८६ जणांनी घेतला.
बाॅक्स
स्थिती झाली उलट
एटापल्ली तालुक्यात काेराेना प्रतिबंधक लसीकरणाच्या सुरुवातीला लस घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यावेळी लसीचा तुटवडा निर्माण झाला हाेता. लसीकरणासाठी आलेले नागरिक परत जात हाेते. परंतु आता याउलट चित्र आहे. लसीचा साठा असूनही नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवित आहेत. दुर्गम भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत अनास्था आहे काय की लसीकरण पूर्ण हाेण्याकडे वाटचाल सुरू आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
बाॅक्स
पीएचसी स्तरावरील लसीकरण
एटापल्ली तालुक्यात चार प्राथमिक आराेग्य केंद्र आहेत. या केंद्रांतर्गत लसीकरण करण्यात येत आहे. कसनसूर प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत १ हजार ६५३, ताेडसा आराेग्य केंद्रांतर्गत ७२४, बुर्गी केंद्रांतर्गत १ हजार २८ तर गट्टा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत ४०९ लाेकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. यामध्ये काही लाेकांनी दुसरा डाेसही घेतला आहे. तालुक्यात प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत काेविशिल्डचा पहिला डाेस ३ हजार ५८१ लाेकांनी तर दुसरा डाेस १ हजार ३९३ अशा एकूण ४ हजार ९७४ लाेकांनी घेतला. तर काेव्हॅक्सिनचा पहिला डाेस ७२२ लाेकांनी व दुसरा डाेस २२९ लाेकांनी घेतला. एकूण ९५१ लाेकांनी काेव्हॅक्सिनचा डाेस घेतला.