झिंगानूर परिसरातील रमेशगुडम, कर्जेली, बोडुकस्सा, किष्टय्यापल्ली, कोर्लामाल, कोर्लाचेक आदी गावांमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अनेकदा पक्के रस्ते निर्माण करण्याची मागणी केली, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते. झिंगानूर ते रमेशगुडम मार्गाने ब्रिटिशांच्या काळात रस्ते होते, परंतु स्वातंत्र्याेत्तर काळानंतर या भागात रस्ते बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक पक्के रस्ते बांधकामाची मागणी करीत आहेत, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे. मातीमय रस्त्यानेच नागरिक प्रवास करीत असल्याने, त्यांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागताे.
बाॅक्स .....
टाॅवर असूनही कव्हरेजची समस्या
झिंगानूर येथे २०१५-१६ मध्ये बीएसएनएल टाॅवर उभारण्यात आले. टाॅवर असूनही विविध समस्या निर्माण हाेत आहेत. इतरांशी संपर्क केल्यानंतर आवाज न येणे, मधेच संभाषण खंडित हाेणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत. या टाॅवरच्या भरवशावरच झिंगानूर परिसरातील नागरिकांनी हजारो मोबाईल विकत घेतले, परंतु आता मोबाईल शोभेची वस्तू बनले आहेत. झिंगानूर परिसरात उमानूर, रोमपल्ली, देचलीपेठा, पेंटिपाका, अंकिसा, गोल्लाकर्जी, वडदम आदी गावांमध्ये बीएसएनएल टाॅवर आहेत, परंतु केवळ झिंगानूर येथील टॉवरचीच समस्या आहे. येथील कव्हरेजची समस्या लवकर निकाली काढावी, अशी मागणी नागरिकांनी मागणी केली आहे.