आमदारांच्या प्रश्नावर दखल नाही : आमगाव ग्रामपंचायतीची वॉर्ड म्हणून नोंद देसाईगंज : नाव उलटल्याने प्रकाशझोतात आलेल्या देसाईगंज तालुक्यातील नवीन लाडज या गावाची महसूल विभागाच्या दप्तरी कोणत्याही प्रकारची नोंद नसून त्याला आमगाव ग्रामपंचायतीमधील वार्ड क्रमांक ३ असे संबोधण्यात आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील जुनी लाडज हे गाव चहुबाजुंनी नद्यांनी वेढले आहे. दरवर्षी पूराची समस्या या गावाला भेडसावत असल्याने १९६० साली या गावाचे तत्कालीन आरमोरी तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले. सद्य:स्थितीत हे गाव देसाईगंज तालुक्यात येते व नागरिक या गावाला नवीन लाडज असे संबोधतात. मात्र शासन दरबारी याबाबतची अधिकृत नोंद नाही. गावामध्ये केवळ जिल्हा परिषदेची शाळा आहे. इतर सोयीसुविधांचा मात्र या गावामध्ये अभाव असल्याचे दिसून येते. नवीन लाडज या गावाची नोंद महसूल विभागात नोंद का करण्यात आली नाही, असा प्रश्न आमदार क्रिष्णा गजबे यांनी २०१६ मधील हिवाळी अधिवेशनादरम्यान उपस्थित केला होता. शासनाकडे नोंद नसण्याचे कारण काय व नसल्यास विलंबाची कारणे काय, हे सुध्दा प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतरही मात्र महसूल विभागाने याबाबीची दखल घेतली नाही. परिणामी ६० वर्षानंतरही गाव वसून स्वतंत्र गावाची अधिकृत ओळख नवीन लाडजला मिळाली नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. १८ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनात हा मुद्दा आणखी गाजणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
नवीन लाडज गावाची नोंदच नाही
By admin | Published: July 17, 2016 1:13 AM