गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली, भामरागड व अहेरी या तिन्ही प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत नागपूर येथील अपर आयुक्तस्तरावरून तांदूळ व चना वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला नाही. शासनाने वस्तू पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेला अद्यापही मंजुरी दिली नसल्याने आश्रमशाळेतील कोठीगृह रिकामेच असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील तिन्ही प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांना सत्र सुरू झाल्यानंतर जून महिन्यात दरवर्षी गहू, तांदूळ, तूरडाळ, चना, मूंगडाळ, उडीदडाळ, चवळी, शेंगदाणे, पोहे, मटकी, वाटाणा, तेल, साखर, मिठ, मिरची पावडर, हळद पावडर, मसाला पावडर, मोहरी व जिरा आदीसह साबून, खोबरा तेल या आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. याकरिता आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील आयुक्त कार्यालयस्तरावरून निविदा प्रक्रिया राबविली जाते. या निविदा प्रक्रियेला राज्य शासनाची मंजुरी आवश्यक असते. मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून आयुक्तस्तरावरून आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाला आश्रमशाळांसाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येतो. मात्र शासनाने यावर्षी शाळा सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटूनही निविदा प्रक्रियेला मंजुरी दिली नाही. त्यामुळे तांदूळ व चना वगळता अन्य कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचा गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये पुरवठा झाला नाही. आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीमार्फत जुलै महिन्यात गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय आश्रमशाळांना २२३५.५० क्विंटल तांदूळ व ५२.७० क्विंटल चना या दोनच वस्तूचा पुरवठा करण्यात आला. इतर वस्तूंचा पुरवठा न झाल्यामुळे आश्रमशाळेतील कोठीगृह रिकामेच आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
शासकीय आश्रमशाळेत वस्तूंचा पुरवठा नाही
By admin | Published: September 28, 2015 1:42 AM