रोहयो कामे रखडली : मजुरांचे स्थानांतरण वेगाने सुरूगडचिरोली : जिल्हाभरातील एकूण ४५७ ग्रामपंचायतींपैकी केवळ ३६७ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोचे काम सुरू झाले असून सुमारे ९० ग्रामपंचायतीमध्ये अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. विशेष म्हणजे या ग्रामपंचायती दुर्गम भागातील असल्याने नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचा हंगाम संपल्यानंतर अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर यांच्या हाताला कोणतेही काम राहत नाही. त्यामुळे या नागरिकांना बेरोजगारीचे जीवन जगावे लागते. परिणामी सदर नागरिक रोजगाराच्या शोधात चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यासह छत्तीसगड व तेलंगणा राज्यात निघून जातात. शेतीचा हंगाम संपल्यानंतर रोजगाराची समस्या निर्माण होते. ही देशपातळीवरीलच समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली.धानपिकाचा हंगाम संपल्यानंतर रोहयो कामांची मागणी वाढते. रोहयो विभागाच्या २० फेब्रुवारीच्या अहवालानुसार एकूण ४५७ ग्रामपंचायतींपैकी ३६७ ग्रामपंचायतीमध्ये काम सुरू आहे. मात्र सुमारे ९० ग्रामपंचायतीमध्ये एकही काम सुरू नाही. यंत्रणास्तर व ग्रामपंचायतस्तरावर जिल्हाभरात सुमारे ६२ हजार ४४७ मजूर काम करीत आहेत. गावातील मजूर रोहयो कामांची मागणी करतात. मात्र निधी नाही, कामाला मंजुरी नाही, अशा प्रकारचे विविध कारणे दाखवून प्रशासन नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देत नसल्याचे अनेकवेळा दिसून आले. काही ग्रामपंचायतीमध्ये तर रोजगार मागण्याचा अर्जसुद्धा स्वीकारला जात नाही. गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. येथील नागरिक रोजगारासाठी भटकत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)
९० ग्रा.पं.मध्ये कामेच नाही
By admin | Published: February 28, 2016 1:38 AM