अरविंद पोरेड्डीवार : आरमोरीत रोवणी करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : शेतात रोवणीची कामे करणाऱ्या गरीब महिलांच्या दैनंदिन समस्या, आरोग्यविषयक, कौंटुंबिक समस्या सोडविण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आरमोरी येथील बँकेच्या सभागृहात ‘रोवणीची कामे करणाऱ्या महिला व त्यांच्या समस्यांचे निराकरण’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकबिरादरीचे संचालक अनिकेत आमटे यांच्या हस्ते झाले. यावेळी समीक्षा आमटे, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भातकुलकर, मयूर जिल्लेवार, रितेश पाल, बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनिल साळवे उपस्थित होते. पावसाळ्यात शेतांमध्ये जाऊन रोवणीची कामे करताना महिला मजुरांचा तुटवडा आढळून येत आहे. रोवणीची कामे करताना महिलांवर वीज पडण्याची शक्यता असते. चिखलामध्ये काम करताना श्वापदांचा दंश तसेच आजार होण्याची शक्यता असते. एवढी कामे करूनही महिला सायंकाळी घरी परतल्यानंतर स्वयंपाक करणे, मुलांना सांभाळणे आदी कामे करतात. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ गरजेचे आहे, असेही पोरेड्डीवार म्हणाले. यावेळी मजूर महिला व बचत गटाच्या महिला हजर होत्या.
महिला मजुरांच्या समस्यांसाठी व्यासपीठ हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:17 AM