गडचिराेली : येथून १५ अंतरावर असलेल्या पाेर्ला येथे काेट्यवधी रुपये खर्च करून ३३ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यात आले. हे उपकेंद्र सुरू हाेऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, या उपकेंद्रातून ग्राहकांना याेग्य वीज पुरवठ्याची सेवा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
हलक्याशा वादळाने येथील पुरवठा खंडित हाेत आहे. सध्या उकाड्याचे दिवस सुरू असल्याने नागरिकांना कुलर, पंखे, आदी उपकरणांची गरज भासते. मात्र, वीज पुरवठा खंडित हाेत असल्याने नागरिकांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पाेर्ला परिसरात या वीज उपकेंद्रातून बऱ्याचदा कमी दाबाचा वीज पुरवठा हाेत असल्याने वीज उपकरणे निकामी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येथील वीज समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.