शहर गोदरीमुक्तीसाठी गडचिरोली पालिकेचा पुढाकार दिलीप दहेलकर गडचिरोली स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली पालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून वैयक्तिक शौचालय बांधण्याचा जंबो कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र विहित कालावधीत पालिका प्रशासनाने वैयक्तिक शौचालय बांधकामाचे १०० टक्के उद्दिष्ट गाठले नाही. त्यामुळे आता गडचिरोली शहर १०० टक्के गोदरीमुक्त करण्यासाठी शौचालयाच्या वापरावर भर देत पालिकेच्या क्षेत्रात १० नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. या शौचालयाचे बांधकाम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाने ३ हजार ५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी पालिका प्रशासनाने ३० एप्रिल २०१७ पर्यंत १ हजार ५५० वैयक्तिक शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. गडचिरोली पालिकेतर्फे नागरीकांकडून प्राप्त अर्जांपैकी शहरात एकूण २ हजार ५०० शौचालय मंजूर करण्यात आले. यापैकी १ हजार ५५० शौचालय पूर्ण केले असून उर्वरित शौचालयाचे काम सुरू आहे. पालिका प्रशासनाला शौचालय बांधकामासाठी तीन कोटीचा निधी शासनाकडून प्राप्त झाला होता. यापैकी पालिकेने २ कोटी ४८ लाख रूपये लाभार्थ्यांच्या अनुदानावर खर्च केले. आता पालिकेकडे ५२ लाख रूपयांचा निधी शिल्लक आहे. सध्या स्थितीत गडचिरोली शहरातील वैयक्तिक शौचालयाचे काम ६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाने गडचिरोली पालिकेला ३१ मार्च २०१७ पर्यंत मुदत दिली होती. मात्र अनेक शौचालय अपूर्ण असल्याने ही मुदत महिनाभराच्या कालावधीने वाढविण्यात आली. ३० एप्रिल २०१७ पर्यंत शौचालय बांधण्याची अखेरची डेडलाईन होती. या तारखेपर्यंत पालिकेने गडचिरोली शहरात १ हजार ५५० शौचालयाचे काम पूर्ण केले. गोदरीमुक्तीसाठी पालिका प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीही पुढाकार घेतला होता. गुड मॉर्निंग पथक गठीत करून सकाळच्या सुमारास उघड्यावर बसणाऱ्या १०० वर नागरिकांवर आजवर दंडात्मक कारवाई पालिकेने केली आहे. आता शहरातील एकही नागरिक उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी शहरात सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार आहे.
१० सार्वजनिक शौचालये होणार
By admin | Published: May 03, 2017 1:25 AM