११ वीच्या २३३ तुकड्या : उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमीगडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गडचिरोली जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ७४.९८ आहे. जिल्ह्यात एकूण १२ हजार १४७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. ११ वी वर्गाच्या एकूण जागा १६ हजार आहेत. यामुळे यंदा ११ वीच्या ४ हजार जागा शिल्लक राहणार आहेत. गडचिरोली तालुक्यात २३ कनिष्ठ महाविद्यालय असून कला व विज्ञान शाखेच्या २३ तुकड्या आहेत. देसाईगंज तालुक्यातील १३ कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या २१ तुकड्या आहेत. आरमोरी तालुक्यातील १७ कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान शाखेच्या मिळून २८ तर कुरखेडा तालुक्यातील १६ कनिष्ठ महाविद्यालयात कला व विज्ञान शाखेचे मिळून २२ तुकड्या आहेत. कोरची तालुक्यात १० कनिष्ठ महाविद्यालय असून १२ तुकड्या आहेत. धानोरा तालुक्यातील १५ कनिष्ठ महाविद्यालयात १८ तुकड्या आहेत. चामोर्शी तालुक्यात २४ कनिष्ठ महाविद्यालय असून कला शाखेच्या ३२ व विज्ञान शाखेच्या ८ अशा एकूण ४० तुकड्या आहेत. मुलचेरा तालुक्यातील ११ कनिष्ठ महाविद्यालयात १५ तुकड्या आहेत. अहेरी तालुक्यात १३ कनिष्ठ महाविद्यालय असून एकूण १७ तुकड्या आहेत. एटापल्ली तालुक्यातील ८ कनिष्ठ महाविद्यालयात ११ तुकड्या तर भामरागड तालुक्यात ५ कनिष्ठ महाविद्यालयात ६ तुकड्या आहेत. अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यात ८ कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेच्या २, विज्ञान शाखेच्या २ अशा एकूण १० तुकड्या आहेत. राज्यासह नागपूर विभागात दरवर्षी ११ वी प्रवेशाचा गुंता कायम असतो. ११ वी प्रवेशाच्या जागा कमी व दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त अशी स्थिती असते. यामुळे राज्यातील अनेक दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश मिळत नाही. ११ वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना भटकंती करावी लागते. गतवर्षी तर ११ वी प्रवेशाचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजला होता. मात्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये इयत्ता ११ वीच्या जागा मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे यंदा १० वी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वीत सहज प्रवेश मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद, शासकीय, अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा तसेच खासगी व्यवस्थापनाच्या मिळून अनुदानित एकूण १६३ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. यापैकी १०५ अनुदानित व ६७ विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयात कला, विज्ञान, एमसीव्हीसी, वाणिज्य शाखा आहेत. सर्व भौतिक सुविधा, उच्च माध्यमिक शिक्षकवृंद, ग्रंथालय सुविधा व गुणवत्ता टिकविणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. या तुलनेत भौतिक सुविधांचा अभाव व गुणवत्तेत मागे असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशाच्या अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
११ वीच्या चार हजार जागा शिल्लक राहणार
By admin | Published: June 19, 2014 12:04 AM