खरीप हंगामासाठी थकीत चुकाऱ्यांमुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या जाणून आ. कृष्णा गजबे यांनी २८ जुलै रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन आठ दिवसांच्या आत थकीत चुकारे व खरीप हंगामातील उर्वरित बोनसची रक्कम अदा करण्यात न आल्यास संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी व शेतकऱ्यांच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
परंतु या समस्येची दखल घेण्यात न आल्याने आमदार गजबे यांनी देसाईगंज-कुरखेडा महामार्गावरील रेल्वे भूमिगत पुलाजवळ चक्का जाम आंदोलन करून लक्ष वेधले. त्यानुसार खरेदी-विक्री संस्थेच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या थकीत चुकाऱ्यांचे ४१८ कोटी रुपये व आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या धानाचे ८२ कोटी असे एकूण ५०० कोटी रुपये या संस्थेकडे वळते केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. किती दिवसात थकीत चुकारे व बाेनसची रक्कम बॅंक खात्यात जमा हाेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.