तपासणी : आॅपरेशन थिएटरची परवानगी नाही देसाईगंज : क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट अॅक्ट नुसार नियमांना धाब्यावर बसूवन नियमबाह्य रूग्णांची शस्त्रक्रिया करणाऱ्या देसाईगंज शहरातील तीन खासगी रूग्णालयांकडे शस्त्रक्रिया थिएटरची रितसर परवानगीच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबतचा अहवाल सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर होणार आहे. त्यामुळे देसाईगंज शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. १५ मार्च २०१७ पासून देसाईगंज शहरात ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरिक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या समितीने खासगी रूग्णालयांची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीदरम्यान बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून दवाखाना थाटणाऱ्या डॉक्टरांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आॅपरेशन थिएटरची नोंदणीच केली नाही. पीसीपीएनडीटी रेकॉर्ड उपलब्ध नाही. पर्यावरण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र नाही. रूग्णालयामध्ये जीएनएम कर्मचारी नाही. देसाईगंज नगर परिषदेचेही नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही. अग्नी सुरक्षा प्रमाणपत्र सुध्दा उपलब्ध नाही. काही रूग्णालयांनी तर जिल्हा शल्य चिकित्सकांकडून घेतलेली परवानगी सुध्दा कालबाह्य झाली आहे. मात्र त्यांनी अजूनपर्यंत नोंदणीचे नुतनीकरण केले नसल्याचे तपासणीत दिसून आले आहे. (वार्ताहर)
देसाईगंजातील तीन रूग्णालय होणार बंद
By admin | Published: April 17, 2017 1:30 AM