गडचिरोली : शहराच्या जुनी वडसा वाॅर्डालगतच्या ए. ए. एनर्जी थर्मल प्लांटमध्ये झालेल्या बाॅयलरच्या स्फोटात एका तरुण इंजिनिअरला जीव गमवावा लागला. त्या इंजिनिअरचे पुढील महिन्यात लग्न होणार होते. या अपघातात इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. २७) पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडला.
गंभीर जखमी दोन मजुरांवर ब्रह्मपुरी येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातातील मृत इंजिनिअरचे नाव संजय सिंह असून ते मध्य प्रदेशातील रिवा येथील रहिवासी होते. गंभीर जखमी झालेल्यांत गौरव केळझरकर व भाऊ शेंडे या दोघांचा समावेश आहे.
गंभीर जखमी अवस्थेत इंजिनिअरसह तिघांनाही देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डाॅक्टर उपलब्ध नसल्याने तिघांनाही ब्रह्मपुरी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान इंजिनिअर संजय सिंह यांचा मृत्यू झाला. इतर दोन गंभीर जखमी मजुरांवर उपचार सुरू आहे.
१९ नोव्हेंबरला ठरले होते लग्न
बाॅयलरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मध्य प्रदेशातील रिवा येथील रहिवासी असलेल्या इंजिनिअर संजय सिंह यांचे पुढील महिन्यात १९ नोव्हेंबर रोजी लग्न ठरले होते. लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तिसऱ्या मजल्यावरून पडले खाली
देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा वाॅर्डालगत ए. ए. एनर्जी प्लांट मागील चार महिन्यांपासून बंद होता. दोन दिवसांपूर्वीच सदर प्लांट सुरू करण्यात आला. २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास इंजिनिअर संजय सिंह येथील कामावर असलेल्या दोन मजुरांसह प्लांट तपासणीकरिता गेले होते. दरम्यान, बाॅयलरचा अचानक स्फोट होऊन सर्वत्र धूर पसरल्याने घाबरलेल्या इंजिनिअरचा तोल गेला आणि ते तिसऱ्या माळ्यावरून खाली पडले.
फोटो- 27gdph18