लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पावभर भाजी घेतेवेळी भाजीपाला विक्रेता दांडी तर मारणार नाही ना, असा विचार करून किलाेकाट्याकडे बारीक लक्ष ठेवणारा ग्राहक, पंपावर पेट्राेल भरतेवेळी मात्र चांगलेच बिनधास्त राहत असल्याचा प्रत्यय येत आहे. त्याचा गैरफायदा उचलत डिलिव्हरी बाॅय ग्राहकाला कमी पेट्राेल देऊन फसवणूक करत असल्याचे ‘लाेकमत’ने शुक्रवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. गडचिराेली शहरातील काही पेट्राेल पंपांना भेटी देऊन पेट्राेल भरतेवेळी ग्राहक काेणत्या चुका करतात याची पाहणी केली असता, बहुतांश ग्राहक जागरूक असल्याचे दिसून आले. काही ग्राहक मात्र त्याकडे फारसे लक्ष ठेवत नाही. त्यामुळे अशाच ग्राहकांची डिलीव्हरी बाॅयकडून फसवणूक केली जात असल्याचे दिसून आले. यामध्ये विशेष करून माेपेड वाहन असलेल्या वाहनधारकांची फसवणूक हाेण्याची शक्यता जास्त असते. माेपेड वाहनाचे पेट्राेल भरण्याचे काॅक मागच्या बाजूस राहते. मशीनच्या समाेर वाहन लावल्यानंतर पेट्राेल भरण्यासाठी वाहनधारक पेट्राेलचे झाकण काढण्यात व्यस्त राहते. यावेळी ताे मशीनवर शून्य आले आहेत काय, याची शहानिशा करत नाही. झाकण उघडल्याबराेबर मागच्याच रिडिंगने सुरूवात हाेऊन त्याला पेट्राेल देण्याचे प्रकार घडत आहे. पूर्वीच्या ग्राहकाने ५० रुपयांचे पेट्राेल भरले हाेते. माेपेड वाहन असलेल्या ग्राहकाने २०० रुपयांच्या पेट्राेलची मागणी केली. मात्र, वाहनाचे झाकण काढण्यात व्यस्त असलेल्या वाहनधारकाचे मशीनवर अगाेदरच ५० रुपयांच्या पेट्राेलची रिडिंग हाेती. त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे डिलीव्हरी बाॅयने ५० रुपयांपासूनच सुरुवात करून प्रत्यक्ष ग्राहकाला १५० रुपयांचेच पेट्राेल दिले. यामध्ये संबंधित ग्राहकाची ५० रुपयांची फसवणूक झाली. मात्र, ही फसवणूक त्याच्या लक्षात आली नाही. २०० रुपयांची एक नाेट देऊन ग्राहक निघून गेला.
शासनाचे नियम अतिशय कडक काही पेट्राेल पंपांवर पेट्राेल व डिझेल कमी देत असल्याचा थेट आराेप ग्राहकांकडून हाेत असला तरी यात फारसे तथ्य नाही. कारण पेट्राेल पंप चालविण्याचे नियम अतिशय कडक आहेत. वर्षातून एकदा वैध मापन शास्त्राकडून पेट्राेल पंपाची तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये मशीनवर रिडिंग दाखविते तेवढेच पेट्राेल दिले जाते काय, हे बघितले जाते. रिडिंग व पेट्राेलसारखे असल्याची शहानिशा झाल्यानंतर पेट्राेल काढणाऱ्या मशीनला वैधमापन शास्त्राकडून सील केले जाते. मध्यंतरी मशीनमध्ये बिघाड निर्माण झाल्यास वैधमापन शास्त्राच्या परवानगीशिवाय मशीन खाेलता येत नाही. वैधमापन शास्त्र विभागाने परवानगी दिल्यानंतरच मशीन खाेलली जाते. तांत्रिक बिघाड संबंधित कारागिरांकडून दुरूस्त केल्यानंतर पुन्हा एकदा पेट्राेलपचे मापन केले जाते. त्यानंतर पुन्हा मशीनला सील केले जाते. त्यामुळे मशीनमधून कमी पेट्राेल देणे शक्य नाही.
ग्राहक पाहून केली जाते फसवणूक
काही डिलीव्हरी बाॅय पेट्राेलपंपांवर मागील दहा वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे ग्राहकाचा चेहरा बघूनच ग्राहक जागरूक आहे की नाही, हे ओळखतात. ग्रामीण भागातील नागरिक, लहान मुलगा किंवा महिला असल्यास त्यांची फसवणूक हाेण्याची शक्यता अधिक राहते. ‘लाेकमत’ प्रतिनिधीने जवळपास एक तास निरीक्षण केल्यानंतर एका ग्राहकाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. ग्राहकाने पेट्राेल पंपाच्या मशीनवरील रिडिंगकडे लक्ष ठेवल्यास त्याची फसवणूक हाेत नाही.
पंपावर पेट्राेल-डिझेल टाकताना घ्या काळजी
मशीनवरील रिडिंग शून्य आहे हे आधी पाहावे. पेट्राेल टाकत असताना काही हालचाली केल्या जात आहेत का? याकडे लक्ष ठेवावे. पेट्राेल टाकत असताना लक्ष इतरत्र विचलित हाेऊ देऊ नये, काही शंका असल्यास प्रत्येक पंपावर ५ लिटरचे प्रमाणित माप उपलब्ध आहे, त्याद्वारे खात्री करावी.