लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : येथे दोन दिवसांपूर्वी (दि.२३ नोव्हेंबर) झोपेतून उठवत पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आणि पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीला हुडकून काढण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, त्याने आपला गुन्हा कबूल करत या हत्याकांडामागील कारणही स्पष्ट केले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश प्रभाकर श्रीकुंटवार (२५ वर्षे) रा. काळागोटा, आरमोरी असे आरोपीचे नाव आहे. पंचवटी नगरातील मृत निमगडे यांच्या शेजारी रात्री चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी नितेश याला गौतम निमगडे यांनी पाहिले आणि हटकले. त्यामुळे चोरी करण्याचा त्याचा प्रयत्न फसला. तोच राग मनात ठेवून नितेश याने लगेच हातात धारदार दगड घेऊन गौतम निमगडे यांचे घर गाठले. दरवाजाची घंटी वाजविली. त्यांनी दार उघडताच आरोपीने कोणताही विचार न करता गौतम निमगडे व त्यांची पत्नी माया यांच्यावर हल्ला केला. यात गौतम यांचा मृत्यू झाला, तर माया गंभीर जखमी झाल्या. कोणाशीही वैर नसणाऱ्या व्यक्तीच्या या हत्याकांडाने आरमोरी शहर हादरून गेले होते.
झटापटीत पडलेल्या मोबाईलमुळे लागला शोध- आरोपी नितेश याने गौतम निमगडे यांच्या डोक्यावर दगडाने वार केल्यानंतर निमगडे यांची पत्नी त्यांना सोडवण्यासाठी मध्ये आली. त्यामुळे आरोपीने तिलाही दगडाने मारहाण केली. या झटापटीत आरोपीचा मोबाईल घटनास्थळी पडला. त्या मोबाईलवरूनच आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. या घटनेनंतर आरोपी हा ब्रह्मपुरी तालुक्यातील बरडकिन्ही येथील आपल्या बहीणजावयाकडे पळून गेला होता. तेथून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
बलात्कार प्रकरणात सुटलेला आरोपीया प्रकरणात अटक झालेला आरोपी नितेश श्रीकुंटवार हा चिडखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. १०-१२ दिवसांपूर्वीच तो बलात्काराच्या एका प्रकरणात चंद्रपूर येथील कारागृहातून जामिनावर सुटून आला होता. घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत होता, असे सांगितले जाते. चोरी करण्याच्या उद्देशाने गेला पण तो डाव यशस्वी न झाल्याने रागात त्याने ही हत्या केली. आता पाेलीस काेठडीदरम्यान त्याचे आणखी काही कारनामे समाेर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे करीत आहेत.