लाेकमत न्यूज नेटवर्कमानापूर (देलनवाडी) : आरमोरी ते कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा या मार्गावर सध्या नागरिकांची वर्दळ चांगलीच वाढली आहे. यात जवळपास ४० किलोमीटरच्या अंतराच्या मार्गावरून ४० पेक्षा जास्त गावातील लोकांना प्रवास करावा लागतो, पण प्रवासाची साधनेच अपुरी असल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांमधून अतिशय धोकादायक प्रवास करावा लागत आहे.या मार्गावर सध्या एसटी महामंडळाची एकच बस जाते. संध्याकाळी ही बस मालेवाड्याला मुक्कामी जाते आणि सकाळी परत येते. त्यानंतर दिवसभर खासगी वाहनांच्या भरवशावर राहावे लागते. ही वाहने मग कोंबड्यांप्रमाणे प्रवाशांना गाडीत अक्षरश: कोंबून बसवितात. त्यात बसवणे शक्य नसते त्यावेळी गाडीच्या टपावर बसूनही लोक प्रवास करतात. नाईलाज म्हणून असा प्रवास करावा लागत असला तरी तो अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.
खासगी ट्रॅव्हल्स बसला परवडते, एसटीला का नाही?- आरमोरी ते मालेवाडा या मार्गात वैरागड, देलनवाडी, मानापूर अशा प्रमुख गावांसह मुख्य मार्गावर २० पेक्षा अधिक, तर रस्त्यापासून काही अंतरावर असणारी जवळपास २५ गावे आहेत. त्यामुळे ४० पेक्षा जास्त गावांमधील प्रवाशांना मालेवाडा किंवा आरमोरीकडे यायचे असल्यास एसटी बस नसते. - याचा फायदा आता जीपगाड्यांसोबत खासगी ट्रॅव्हल्सवालेही घेऊ लागले आहेत. त्यांना या मार्गावर प्रवासी मिळत असताना एसटी महामंडळ आपल्या फेऱ्या का वाढवत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.