लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या दराची गावात पाण्याची तीव्र टंचाई होती. गावकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या गावात ठक्करबापा आदिवासी सुधार योजनेतून विहीर मंजूर करण्यात आली असून या विहिरीचे खोदकाम सुरू झाले आहे.दराची हे गाव कुरखेडा-कोरची तालुक्याच्या सीमेवर आहे. जवळपास २०० लोकसंख्या असलेल्या गावात विहीर नव्हती. त्यामुळे येथील नागरिक तिन्ही ऋतुत गावालगत असलेल्या १० ते १५ फूट खोल खड्ड्यातील पाणी काढून पित होते. उन्हाळ्यामध्ये सदर खड्डा आटत असल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत होती. पावसाळ्यात खड्ड्याचे पाणी पिल्यामुळे विविध आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत होते. गावामध्ये विहिरीचे बांधकाम होणे आवश्यक होते. ही बाब सचिव मोहन माकडे, सरपंच नरोटे यांनी जिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटी यांच्या लक्षात आणून दिली. पुंगाटी यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून ठक्करबापा योजनेतून विहीर मंजूर करायला लावली. मागील चार दिवसांपासून या ठिकाणी विहिरीचे खोदकाम पोकलॅन्ड मशीनच्या सहाय्याने सुरू झाले आहे. काम अतिशय गतीने सुरू असल्याने ते लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या विहिरीमुळे गावातील नागरिकांना पहिल्यांदाच शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.गावाजवळील खड्डा अतिशय धोकादायक होता. खड्ड्याच्या मध्यभागी लाकडे टाकून त्यावर उभे राहून महिलांना पाणी काढावे लागत होते. एखाद्या वेळेस महिलेचा पाय घसरल्यास जीवितहानी होण्याची शक्यता होती. विहिरीचे बांधकाम झाल्यानंतर या खड्ड्यातून पाणी भरण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
दराची गाववासीयांची भागणार तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:56 AM
छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या दराची गावात पाण्याची तीव्र टंचाई होती. गावकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या गावात ठक्करबापा आदिवासी सुधार योजनेतून विहीर मंजूर करण्यात आली असून या विहिरीचे खोदकाम सुरू झाले आहे.
ठळक मुद्देविहिरीचे खोदकाम सुरू : गावाजवळच्या खड्ड्याचे प्यावे लागत होते पाणी