गडचिरोली - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केला. त्यानंतर, आता विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी थेट गडचिरोलीतूनमहाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचारी घोटाळेबाज आणि अत्याचारी असल्याचे सांगत भाजपच्यावतीने गडचिरोलीत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार हे संजय राऊत जो शब्द वापरतात ते आहे, असे म्हणत जोरदार प्रहार केला.
गडचिरोलीत सर्वाधिकवेळा भेट देणारा मुख्यमंत्री मीच असल्याचे सांगत फडणवीसांनी आक्रोश मोर्चाला जनतेचा मोठा प्रतिसाद दिसत असल्याचे म्हटले. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात ना शेतकऱ्यांना मदत केली, ना कामगारांना मदत दिली. ना बारा बलुतेदारांना मदत केली. सर्वसामान्य नागरिकांना एक रुपयाचीदेखील मदत महाविकास आघाडी सरकारने केली नाही. या सरकारने कोविड कालावधीत केवळ दारु दुकानदारांना, बार मालकांना आणि राज्यातील बिल्डर्संना मदत केली. दारु परवान्याची किंमत 50 टक्क्यांनी कमी केली. तर, बिल्डर्स गरीब झाले असून त्यांनाही सवलत दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
जिथे जाऊ तिथे खाऊ, आपण सगळे भाऊ भाऊ असं काम महाविकास आघाडी सरकारचं आहे. या सरकारने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना 5 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली, एवढं एकच चांगलं काम सरकारने केलं. मात्र, यातही पैसा खायचं काम यांनी केलं. सरकारच्या निकटवर्तीयांना, जवळच्या संस्थांना हा निधी दिला. मी स्वत: नांदेडमधील घटनेचा उल्लेख विधानसभेच्या अधिवेशनात केला होता. सरकारने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणारा निधी हडप केला. म्हणजे या सरकारला काय म्हणावं, मी तो शब्द उच्चारणार नाही. संजय राऊत हा शब्द सातत्याने घेत असतात, तसं हे सरकार असल्याचं फडणवीस यांनी म्हटले.