लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक (टिडीसी)च्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोली आणि उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत एकूण ९१ खरेदी केंद्रांसोबत मार्केटिंग फेडरेशनच्या २३ केंद्रांवरून यावर्षी हमीभावाने धान खरेदी केली जाणार आहे. यातील काही केंद्र सुरू झाले असून येत्या सोमवारपासून बहुतांश केंद्र सुरू होणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार आधारभूत किमतीनुसार खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२२-२३ साठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. कोणीही शेतकरी यापासून वंचित राहू नये, म्हणून या नोंदणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन ती ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयांतर्गत ५३ तर अहेरी कार्यालयांतर्गत ३८ खरेदी केंद्रांना यावर्षी मंजुरी दिली आहे. तसेच राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या २४ केंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी काही केंद्र सुरू झाले, तर उर्वरित केंद्र सोमवारपर्यंत सुरू होणार आहेत. तथापि, अहेरी उपविभागात धान उशिरा निघत असल्यामुळे त्या भागातील बहुतांश केंद्र दोन आठवड्यात सुरू होतील.
अधिकृत केंद्रावरच विक्री कराधान ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत: सात- बारा व इतर आवश्यक दस्तावेजासह आपल्या नजिकच्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या खरेदी केंद्राशी, तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधून आपल्या धानाची विक्री करावी आणि शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार आणि अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बी.एस. बरकमकर यांनी केले आहे.
भाडभिडी केंद्रावर शुभारंभ
घोट : आदिवासी विकास महामंडळाच्या विविध कार्यकारी सहकारी संस्था भाडभिडी (बी) या खरेदी केंद्राचे उद्घाटन घोट येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही.ए. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपसभापती कवडू मन्नोर, कर्मचारी वाय.एन. कोडापे, संस्थेचे व्यवस्थापक एल.डी. कोपूलवार, संचालक रा.गा. कोवासे, नागोराव इस्टाम, रुखमाबाई कोवासे, जनार्धन देऊरमले, ना.तु. ठाकूर, सो.न. किरमे, था.पु.फुलझेले, सोमजी गावडे आदी उपस्थित होते.