संदीप विद्यापीठ, नाशिक येथील जीवविज्ञान विभाग व मायक्राेबायाेलाॅजिस्ट साेसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे १२ व १३ जुलै राेजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. ‘क्राॅफ्ट-२०२१’ हा या परिषदेचा मुख्य विषय होता. परिषदेच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून डाॅ. प्रकाश हलामी यांनी ‘सायटाेकिन्स स्टाॅर्म ॲण्ड काेविड-१९’ या विषयावर आभासी पद्धतीने मत मांडले. इस्राईल देशातील एका विद्यापीठाने सूक्ष्मजिवांपासून एक तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा वापर सायटाेकिन्स स्टाॅर्म कमी करण्यासाठी तसेच कोविड नियंत्रणासाठी शक्य आहे, असेही ते म्हणाले.
(बॉक्स)
आवश्यकतेपेक्षा जास्त औषधांचा डोस ठरतोय घातक
- सध्या कोरोना रुग्णांवर जी उपचारपद्धती वापरली जात आहे, ती परिपूर्ण नसून तात्पुरत्या स्वरूपाची आहे. उपचारादरम्यान रुग्णांना आवश्यकतेपेक्षा जास्त औषधांचा डाेस दिला जाताे. त्यामुळे रुग्ण पूर्णतः बरा होत नसून दुसऱ्या आजाराला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे शरीरातील मुख्य अवयवांवर परिणाम होतो.
- मेंदूवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होणे, मूत्रपिंड विकार, त्वचेवर लहान-लहान ठिपके पडणे, अन्ननलिकेत सूक्ष्मजंतूंचा असमतोल, पोटाचे आजार उद्भवणे, शरीरावर सूज येणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, शरीरातील हाडे ठिसूळ होणे तसेच लहान मुलांमध्ये मिस-सी व बुरशीजन्य आजार दिसून येत आहेत, असे डॉ. प्रकाश हलामी म्हणाले.