दिलीप दहेलकर, गडचिराेली : गेल्या ९ ते १० वर्षापासून चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम रखडले आहे. पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षितपणामुळे मंदिराचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. दरम्यान याबाबत या भागातील साधुसंत, महाराजांसह भाविकांनी आक्रमक भूमिका घेत १६ फेब्रुवारी राेजी शुक्रवारला गडचिराेली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
हरणघाट येथील संत मूर्लीधर महाराज यांच्या नेतृत्वात स्थानिक इंदिरा चौकातील शासकीय विश्रामगृहापासून चंद्रपूर मार्गे हा मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले मार्कंडेश्वर देवस्थानच्या जीर्णोध्दार काम व्हावे म्हणून वेळोवेळी देवस्थान ट्रस्ट, सामाजिक संघटना यांच्याद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र काम सुरू झाले नाही. मिळाले ते फक्त आश्वासने तेही पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या याची दखल घेत संत मूर्लीधर महाराज यांनी ९ फेब्रुवारी राेजी मार्कडा तसेच जिल्हयातील भाविकांची व ग्रामस्थांची बैठक आयोजित केली. त्या बैठकीत १६ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता मार्कंडा मंदिरासमाेर साखळी उपोषण व २२ फेब्रुवारीपासून संत मूर्लीधर महाराज आमरण उपोषणाला बसणार असे ठरविण्यात आले होते.
मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम पुरातत्व विभागाने तातडीने सुरू करण्याबाबत संत मुर्लीधर महाराज यांच्या शिष्टमंडळाने २९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी संजय मिणा यांना निवेदन दिले हाेते. याची दखल घेत आगामी निवडणूक लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्कंडादेव येथे भेटीदरम्यान जिर्णोध्दाराच्या कामाचा आढावा घेऊन एमएमआरडीसीच्या माध्यमातून १०० कोटी आणि पुरातत्व विभागाच्या ५ कोटी रूपयांच्या निधीतून काम लवकरात लवकर करा, असे निर्देश सबंधितांना दिले. होते मात्र काम सुरू झाले नाही. अखेर १६ फेब्रुवारी रोजी येथील शहरातील इंदिरा चौकातून संत मुर्लीधर महाराज यांच्या नेतृत्वात माेर्चा काढण्यात आला.
यावेळी संत मुरलीधर महाराज, सुनील शास्त्री महाराज, नेवारे महाराज, पिपरे महाराज, परमेश्वर महाराज, खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, बाबुराव कोहळे, स्वप्नील वरघंटे, गोविंद सारडा, प्रमोद भगत, सुनील दीक्षित, विजय कोमरवार, रितेश पलारपवार, दिलीप चलाख, मनोज हेबिज, दिगंबर धानोरकर आदी उपस्थित होते. मोर्चात जिल्ह्यातील बऱ्याच गावातील महीला पुरुष व भाविक सहभागी झाले होते यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
......तर साखळी उपाेषण करणार
यावेळी संत मुरलीधर महाराज व सुनील महाराज शास्त्री यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम लवकर सुरू करून ते पुर्ण करावे, अन्यथा साखळी उपोषण करणार, असा इशारा यावेळी दिला. जिल्हाधिकारी संजय मिणा यांना मागण्यांचे निवेदन स्विकारले व आंदाेलकांशी चर्चा केली.