आरमोरी तालुक्यातील वडेगाव येथील धान खरेदी केंद्रावर अंदाजे १८ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आलेली आहे. खरेदी केलेला धान उघड्यावर पडून आहे. त्यामुळे धान खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रावर जागा शिल्लक राहिली नाही. खरेदी केंद्रावर पडून असलेल्या धानाची उचल न केल्यास व अवकाळी पाऊस आल्यास खरेदी केलेल्या काेट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी होऊन धान खराब होण्याची शक्यता आहे. तसेच अजून अनेक शेतकऱ्यांच्या धानाचा काटा होणे बाकी आहे.
आदिवासी विविध कार्यकारी संस्था कुरंडीमालमार्फत वडेगाव येथे सुरू असलेला धान खरेदी केंद्र अतिदुर्गम भागात असल्यामुळे येथील धान उचलण्यास शासन दिरंगाई करीत आहे. या केंद्रावर खाली जागेचा अभाव आहे. ओटे धानाने भरलेले आहेत. त्यामुळे धान खरेदी करण्यास अडचण निर्माण येत आहे. जागेअभावी धान खरेदी बंद ठेवावी लागत आहे. त्यामुळे खरेदी केलेल्या धानाची उचल शासनाने लवकर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.