लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : नागरिकांच्या जीवाचा घाेट घेणाऱ्या वाघांचा बंदाेबस्त करावा, या प्रमुख मागणीसाठी भ्रष्टाचारविराेधी जनआंदाेलन व भारतीय जनसंसद यांच्या नेतृत्वात गडचिराेली तालुक्यातील वाघ प्रभावित असलेल्या २० गावांमधील हजाराे नागरिकांनी मंगळवारी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. शहरातील इंदिरा गांधी चाैक ते पाेटेगाव मार्गावरील वनसंरक्षक कार्यालयापर्यंत माेर्चा काढण्यात आला. माेर्चाचे नेतृत्व भ्रष्टाचारविराेधी जनआंदाेलनाचे राज्य समिती विश्वस्त डाॅ. शिवनाथ कुंभारे, भ्रष्टाचारविराेधी जनआंदाेलनाचे जिल्हा संघटक तथा जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, समाजसेवक देवाजी ताेफा, जिल्हा उपाध्यक्ष रमेश बांगरे, जिल्हा सचिव नीलकंठ संदाेकार, आंबेशिवणीचे उपसरपंच याेगाजी कुडवे, विलास निंबाेरकर, रमेश भुरसे आदींनी केले. आंदाेलनात २० गावांमधील जवळपास दाेन हजार नागरिक सहभागी झाले हाेते. गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांपासून जंगल दाेन ते तीन किमी अंतरावर आहे. एवढ्या परिसरात नागरिकांच्या शेती आहेत. त्यामुळे शेतीवरच जावेच लागते. शेतीवर जाणाऱ्या नागरिकांवर वाघ हल्ला करीत आहे. या वाघाचा बंदाेबस्त करावा तसेच इतरही वाघांना येेथून हटविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदाेलन करण्यात आले. माेर्चा वनसंरक्षक कार्यालयात पाेहाेचल्यानंतर त्याठिकाणी सभेचे आयाेजन करण्यात आले. या सभेला विजय खरवडे यांच्यासह इतरांनी मार्गदर्शन केले. वाघाचा बंदाेबस्त करण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करू, असे आश्वासन विजय खरवडे यांनी दिले. तसेच भविष्यात माेठे आंदाेलन उभारले जाईल, असा इशारा वनविभागाला दिला. सभेनंतर मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन देण्यात आले.
या आहेत नागरिकांच्या प्रमुख मागण्याअमिर्झा परिसरातील गावांमध्ये वाघांनी दहशत माजविली आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाघांचा बंदाेबस्त करावा, वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाख रुपयांची मदत द्यावी. कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नाेकरी द्यावी. अकार्यक्षम वनाधिकारी व वनकर्मचारी यांची हकालपट्टी करावी. चुरचुरा बिटातील ४० एकर जागेवर अवैध वृक्षताेड करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. तलाठी व वनकर्मचाऱ्याची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी.