शिवणी येथील प्रकार : आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखलआरमोरी : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या शिवणी बूज या गावात अज्ञात इसमांनी रविवारच्या रात्री गावातील मुख्य चौकातील सिमेंट रस्त्यावर खडूने आपण नक्षलवादी असून शिवणी ग्रामपंचायतीवर बॉम्ब टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे शिवणी गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाल सलाम, बॉम्ब स्फोट वार्निंग, गावातील युवराज ठाकरे, ऋषी प्रधान, पंढरी मातेरे, गुणाजी खरकाटे, गोपीनाथ दोनाडकर यांनी ग्रामपंचायतच्या नवीन चपराशांना काढावे व जुनेच चपराशी भरावे, एक महिन्याच्या आत चपराशांना न काढल्यास ग्रामपंचायतीवर बॉम्ब स्फोट करण्यात येईल. ज्यांनी काढले तेच लावतील. नाही तर दरवर्षी तुमचे नुकसान होईल, असा धमकी देणारा मजकूर लिहीण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. पोलीस पाटील शकुंतला पत्रे यांनी याबाबतची माहिती आरमोरी पोलीस स्टेशनला दिली. ठाणेदार महेश पाटील व त्यांची चमू घटनास्थळी पोहोचली. गावातील नागरिकांसोबत ठाणेदारांनी चर्चा केली. त्यावेळी एका नागरिकाने सांगितले की, ग्राम पंचायतीची जुनी कमिटी असताना दोन चपराशी कार्यरत होते. मात्र ग्रामसभेत दोन्ही चपराश्यांना काढण्याचा निर्णय घेतला. नवीन कमिटीने त्यांना काढले व नवीन दोन चपराशी रूजू केले. जुन्या चपराश्यांनी जिल्हा न्यायालयात व उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिला. त्यामुळे चिडून जाऊन त्यांनी हे कृत्य केले असावे, असे सांगितले. आरमोरी पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात ५०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
ग्रा.पं.वर बॉम्ब टाकण्याची धमकी
By admin | Published: March 28, 2017 12:36 AM