अहेरी : कोट्यवधी रूपये खर्च करून शासनाने आदिवासी विकास विभागामार्फत अहेरी प्रकल्पात अनेक गावांमध्ये शासकीय आश्रमशाळांच्या इमारती उभारल्या. मात्र १५ ते २० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या दुरूस्तीकडे प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी इमारतीअभावी तीन वर्गाचे विद्यार्थी एकाच खोलीत बसविल्या जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या अहेरी प्रकल्पांतर्गत खमनचेरू येथे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतची शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळांमध्ये सध्या वर्गखोलींची संख्या नऊ आहे. पुरेशा वर्गखोलीअभावी इयत्ता पहिली, दुसरी व तिसरी हे तीन वर्ग एकाच वर्ग खोलीत भरविल्या जात असल्याची माहिती आहे. यामुळे या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची प्रचंड कुचंबणा होत आहे. अहेरी प्रकल्पांतर्गत विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये शौचालय, इमारत, शिक्षकांची रिक्त पदे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, भौतिकसुविधांचा अभाव आदीसह विविध समस्या ऐरणीवर आल्या आहेत. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर फार मोठा परिणाम होत आहे. आश्रमशाळेच्या दुरवस्थेबाबत पालक, विद्यार्थी व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासन व शासनस्तरावर निवेदनाद्वारे तसेच मौखिक सूचना देऊनही पाठपुरावा केला. मात्र दुर्गम भागातील आश्रमशाळांकडे नागपूर एटीसी कार्यालयाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
खमनचेरू आश्रमशाळेत एकाच खोलीत तीन वर्ग
By admin | Published: August 13, 2015 12:31 AM