५७८ लाभार्थी : एका महिन्यात नऊ बँकांकडून जिल्ह्यात योजनेची अंमलबजावणी दिगांबर जवादे गडचिरोलीउद्योजकांना कमी व्याजदरात व तारणाशिवाय कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली असून सप्टेंबर या एका महिन्यातच गडचिरोली जिल्ह्यातील ५७८ उद्योजकांना ३ कोटी २ लाख ८२ हजार रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. उद्योगासाठी भूमी, श्रम, भांडवल, संघटन या चार बाबी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यातही उद्योगाच्या दृष्टीने भांडवलाला अत्यंत वरचे स्थान आहे. उद्योग स्थापन केल्यानंतर कच्चा माल खरेदी करणे, बाजारातील चढाव-उतारानुसार काही प्रमाणात तोटा झाल्यास उद्योग नियमित चालण्यासाठी जवळ भांडवल असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक उद्योजकांना कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. कर्जाच्या दुप्पट तारण व किलोभर वजनाचे दस्तावेज जोडूनही कर्ज प्रकरण मंजूर होत नाही. त्यामुळे उद्योजक निराशेच्या गर्तेत सापडतो. उद्योजकांना अत्यंत कमी कागदपत्रात व तारणाशिवाय कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना एप्रिल २०१५ महिन्यात सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यात या योजनेची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून करण्यात आली. या योजनेत बँकांनी उद्योजकांसाठी स्वत:चे दार खुले केले. त्यामुळे केवळ एका महिन्याच्या कालावधीत सुमारे ५७८ लाभार्थ्यांना ३ कोटी २ लाख ८२ हजार रूपयांचे कर्ज घेतले आहे. व्यापक जनजागृती झाल्यास या योजनेला आणखी मोठा प्रतिसाद मिळणार आहे.तारणाशिवाय मिळते कर्जमुद्रा योजनेची विशेषत: म्हणजे सदर कर्ज उद्योजकाला कोणत्याही तारणाशिवाय उपलब्ध होते. कोणतेही तारण न ठेवता कर्ज देणारी ही एकमेव योजना आहे. मुद्रा योजना तीन श्रेणीत विभागण्यात आले आहे. पहिल्यांदा उद्योजकाला शिशु श्रेणी अंतर्गत ५० हजार रूपयांचे कर्ज दिले जाते. या कर्जाचा चांगला उपयोग करून उद्योग वाढल्यानंतर त्याला किशोर श्रेणी अंतर्गत ५० हजार ते पाच लाख रूपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यानंतर तरूण श्रेणी अंतर्गत ५ लाख ते १० लाख रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत व्याजदरही अत्यंत कमी आकारला जात आहे. त्यामुळे उद्योजक वर्ग या कर्जाला पसंती दर्शवित आहेत. उद्योजकांसाठी अत्यंत चांगली योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व ग्रामीण बँका या योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी जनजागृती केली जात आहे. सध्या पहिला टप्पा असल्याने शिशु श्रेणी अंतर्गत कर्ज वितरणावर अधिक भर देण्यात येत आहे. - विनोद पाटील, लिड बँक व्यवस्थापक गडचिरोली
मुद्रा योजनेतून तीन कोटींचे कर्ज वितरण
By admin | Published: October 21, 2015 1:24 AM