गडचिरोली : गडचिरोलीवरून आष्टीकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनाला समोरासमोर जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास आष्टी-चामोर्शी मार्गावर आष्टीपासून ५ किलोमीटरवर असलेल्या उमरी गावाजवळ घडला.
प्राप्त माहितीनुसार, ट्रक (क्रमांक एपी १६, टीवाय ६८२२) हा दुपारी गडचिरोलीवरून आष्टीकडे जात होता. उमरीजवळ आष्टीकडून कोनसरीकडे जाणाऱ्या दुचाकीला (क्रमांक एमएच ३३, वाय ४२९५) ट्रकने समोरासमोर जबर धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही फेकल्या जाऊन जागीच गतप्राण झाले. मृतांमध्ये ललिता नुतेश कुसनाके (वय ३२, रा.मुधोली रिठ, ता.चामोर्शी) आणि ऋषिका नुतेश कुसनाके (५) या माय-लेकींसह ललिता यांचा दीर सुरेश विनोद कुसनाके (२२, रा. मुधोली) यांचा समावेश आहे.
सूरज हा आपल्या वहिनी व पुतणीला बामनपेठवरून घरी घेऊन जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेमुळे मुधोली रिठवासीयांवर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक कुंदन गावडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अहेरी येथून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनीही घटनास्थळी भेट दिली.
दुचाकी जळून खाक
दोन्ही वाहनांमधील टक्कर एवढी भीषण होती दुचाकीवरील तिघेही दूर फेकल्या गेले आणि दुचाकीने पेट घेतला. काही वेळातच ती जळून खाक झाली. धडक देणाऱ्या ट्रकचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे. ट्रक आष्टी पोलिसांची ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.