गडचिरोली : कर्मचारी महिलेला रस्त्यात अडवून विनयभंग करणार्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी ३ महिन्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव मोमीन सुबेदीन सिद्दीकी रा. गाझीयाबाद (उत्तरप्रदेश) असे आहे. प्राप्त माहितीनुसार, गाझीयाबाद येथील मोमीन सुबेदीन सिद्दीकी हा इसम गडचिरोली शहरात रस्त्याच्या कडेला कपडे विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक दिवसांपासून करीत होता. एका शासकीय कार्यालयातील कर्मचारी महिला कार्यालयातून आपल्या मुलासह घरी जात होती. दरम्यान मोमीन सिद्दीकी याने रस्त्यात तिचा हात पकडून अश्लील शिविगाळ करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. तत्काळ कर्मचारी महिलेने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मोमीन सिद्दीकी याला अटक करून त्याचेवर भादंविचे कलम ३५४, ३४१, २९४, ५०६ व ५०१ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू होता. आज गुरूवारी सदर प्रकरण न्यायालयात आले. यावेळी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अहिवडे यांनी उपरोक्त मामल्यात आरोपीला दोषी ठरवून त्याला ३ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या मामल्यात शासनातर्फे सरकारी वकील वि. दी. हुकरे यांनी बाजू मांडली. महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपी मोमीन सिद्दीकी याला गडचिरोली पोलिसांनी २० एप्रिल रोजी अटक केली होती. तेव्हापासून सदर आरोपी कारागृहात होता, हे विशेष. (स्थानिक प्रतिनिधी)
आरोपीस तीन महिन्यांचा कारावास
By admin | Published: May 22, 2014 11:54 PM