लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये अनेकांचे दिवाळे निघाले. यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच महागाईचे फटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये डिझेलच्या दरात ६.२८ रुपये, पेट्राेलच्या दरात ५.०६ रुपये व गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १०० रुपयांनी वाढ झाली आहे. उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने हजारो कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आता गॅस सिलिंडर पाेहाेचून गॅसवर स्वयंपाक करण्याची सवय महिलांना झाली आहे; पण पेट्रोल व डिझेलप्रमाणेच गॅसचा हंडाही अवाक्याबाहेर गेल्याने अनेक घरांत पुन्हा चूल पेटायला लागली आहे.पेट्राेल व डिझेलच्या किमतीमध्ये दरदिवशी काही पैशांची वाढ केली जाते. ही वाढ ग्राहकांच्या नजरेस पडत नाही. मात्र, महिनाभरात पेट्राेलच्या दरात २ ते ३ रुपयांची वाढ होते. पेट्राेलचे दर आता ९४ रुपयांच्या पुढे पाेहाेचले असून पुढील एक-दाेन महिन्यांत शंभरी पार करतील, असा अंदाज आहे. डिझेलच्या दरातही वाढ हाेत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून याचा थेट परिणाम इतर वस्तूंच्या किमतीवर हाेत असल्याचे दिसून येत आहे.
डिझेलच्या किमतीत वाढ हाेत आहे. त्यामुळे वाहतुकीचे दर वाढविल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, ग्राहकाला वाढीव वाहतुकीच्या दराविषयी सांगितल्यास ते वाढलेला दर मान्य करीत नाही. त्यामुळे वाहन चालकांना काही प्रमाणात नफा कमी करून व्यवसाय करावा लागत आहे. दरदिवशी डिझेलमध्ये हाेणारी वाढ जनतेच्या लक्षात येत नाही. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.- संदीप डाेईजड, वाहन मालक
शहरात सिलिंडरवरील स्वयंपाकाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे दर वाढत असले तरी ते खरेदी करावी लागत आहे. पूर्वीच्या तुलनेत शासनाने सबसिडी कमी केली आहे. ४०० ते ५०० रुपयांत उपलब्ध हाेणाऱ्या सिलिंडरसाठी आता ७५० रुपये माेजावे लागत आहेत. शासनाने सिलिंडरचे दर कमी करावेत.- मनीषा सेलाेटे, गृहिणी
पेट्राेल ही अत्यावश्यक गरज बनली आहे. त्यामुळे कितीही वाढ झाली तरी ते खरेदी करावे लागणार आहे. याचा गैरफायदा शासनाकडून घेतला जात आहे. पेट्राेल व डिझेलवर विविध प्रकारचे कर शासनाकडून लावले जात असल्याने या वस्तू महाग होत चालल्या आहेत. पेट्राेल व डिझेलचे महत्त्व लक्षात घेऊन त्यावरील कर कमी करण्याची गरज आहे.- शिवराम चरडुके, नागरिक