दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षकांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. त्यांनी त्याच दिवशी मतदारांना दारूचे प्रलोभन देणारे मोरेश्वर गोवर्धन आणि जमकीदास मेश्राम (दोघेही रा. मुरदोली चक) या दोन उमेदवारांसह गुलाबदास देशमुख अशा तीन आरोपींना अटक करून पीसीआर मिळविला. याशिवाय गावात दारू पोहोचवून देणाऱ्या तिघांनाही आता अटक झाली. हे तिघे राममोहनपूर, कालीनगर आणि सुभाषनगर येथील आहेत.
दारू विषारी झाली कशी?
या प्रकरणात मतदारांना वाटप करण्यात आलेली हातभट्टीची दारू विषारी झाली कशी, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे. ज्या ठिकाणी ही दारू गाळल्या गेली त्या ठिकाणावरून इतरही काही ठिकाणी दारूचा पुरवठा झाला होता. पण लक्ष्मणपूरमध्येच दारू घेणाऱ्या लोकांना विषबाधा झाली. त्यामुळे दारूची आयात करणाऱ्यांकडून किंवा गावात साठवून ठेवली त्यावेळी दारूला तीव्र करण्यासाठी त्यात काही रासायनिक पदार्थ मिसळल्या गेले आणि त्यातून रासायनिक प्रक्रिया होऊन ती दारू विषयुक्त झाली असण्याची शक्यता आहे. पोलीस त्यादृष्टीनेही तपास करीत आहेत.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
विषारी दारूचे वाटप करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. तसेच दोन्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाखाची तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना एक लाखाची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.
हातभट्ट्या झाल्या अनियंत्रित
(फोटो- भट्टी)
जिल्ह्याच्या चामोर्शी, गडचिरोली, धानोरा, आरमोरी, अहेरी तालुक्यात हातभट्ट्यांचा सुळसुळाट झाला आहे. मोहफुलासोबत गाळ्या गुळाचा वापर त्यासाठी केला जातो. दारूला अधिक तीव्र करण्यासाठी मिसळल्या जाणाऱ्या पदार्थांचा शरीरावर घातक परिणाम होतो. त्यातूनच लक्ष्मणपूरसारख्या घटना घडतात. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी हातभट्ट्यांवरील कारवाया वाढविण्याची गरज आहे. पण सध्या तरी त्याबाबत अनेक पोलीस ठाणे आणि उत्पादन शुल्क विभाग कानाडोळा करताना दिसत आहे.