गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर (बामणी)नजीकच्या सिरकोंडा जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. ही चकमक मंगळवारी सकाळी १० ते १०.३० वाजताच्या सुमारास उडाली. मृतांमध्ये नक्षल्यांचा डिव्हीजन कमांडर सुनील कुळमेथे व त्याची पत्नी स्वरूपा यांचा समावेश आहे. एका महिला नक्षलीची ओळख पटलेली नाही. या वर्षातील आतापर्यंतचे हे पोलिसांचे सर्वात मोठे यश असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी सी-६० पथकाचे कमांडे व्यंकटापूर परिसरातील सिरकोंडा जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या १० ते १२ नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. त्यामुळे नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. या धुमश्चक्रीनंतर घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह तसेच दोन बंदुका, माओवादी पत्रके व साहित्य आढळून आले.
त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करून शोधमोहिम राबविली जात असल्याचे महानिरीक्षक शिंदे यांनी सांगितले. या कारवाईमुळे सिंरोचा तालुक्यातून नक्षल्यांचे उच्चाटन होईल, असा विश्वास पोलीस अधिकाºयांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अ.पोलीस अधीक्षक राजा रामासामी, अ.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते.
पती-पत्नीवर २२ लाख रुपयांचे बक्षीस
या चकमकीत ठार झालेले सुनील उर्फ विलास मारा कुळमेथे व स्वरूपा उर्फ आमसी पोचा तलांडी हे पती-पत्नी होते. त्यापैकी सुनीलवर १६ लाखांचे तर स्वरूपावर ६ लाखांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते.
मुरूमगावातून एकाला अटक, दोन फरार
धानोरा तालुक्यातील मुरूमगावच्या बाजारात मंगळवारी आलेल्या तीन नक्षल्यांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता दोन जण पोलिसांच्या दिशेने पिस्तोलमधून गोळी चालवून पळून जाण्यात यशस्वी झाले तर हरीष विठ्ठल पोटावी हा प्लाटून ३ चा सदस्य पोलिसांच्या हाती लागला आहे. तो मूळचा मरकेगाव येथील रहिवासी असल्याचे समजते.