लाेकमत न्यूज नेटवर्कअहेरी/पेरमिली : मेडपल्ली ते तलवाडा मार्गावर भरधाव ट्रॅक्टर आणि प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीपमध्ये समोरासमोर टक्कर होऊन जीप चालकासह आणखी दोन जण ठार झाले. याशिवाय इतर १३ जण जखमी झाले. त्यापैकी ४ जणांना पुढील उपचारांसाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. हा अपघात सोमवारी रात्री घडला. सूरज चांदेकर रा. मन्नेराजाराम, मारोती जलम्मा सिडाम (४५ वर्षे) रा. गिऱ्हा आणि बालाजी इरपा कुडमेथे (२१ वर्षे) रा. मिरकल अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, ट्रॅक्टर (एमएच ३३, एफ ३३८८) हा मिरकल येथील विनोद तलांडी यांच्या बकऱ्या आणण्यासाठी नैनेर येथे गेला होता. तिकडून पेरमिली-मेडपल्ली मार्गे परत येत असताना आलापल्लीकडून मेडपल्लीकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या मॅक्स जीपगाडी (एमएच ३१, सीआर ०८१५) सोबत ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृतकांचे मंगळवारी अहेरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास पेरमिली उपपोलीस ठाण्याचे प्रभारी पंकज सपकाळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक धवल देशमुख करीत आहे.
या अपघातातील जखमींपैकी बाराजी करपा कुडमेथे (२१) रा. मिरकल, कमला अर्जुन सिडाम (५०) रा. मन्नेराजाराम, शशिकला श्यामराव मडावी (२९) रा. मन्नेराजाराम आणि रोहित श्यामराव मडावी (३५) या चार जणांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूरला हलविण्यात आले. इतर जखमींमध्ये सुनीता विनायक मडावी (५८) रा. मन्नेराजाराम, सुमनबाई लाचा मडावी (६०), नीता श्यामराव मडावी (१८) रा.घरनूर, राधा गन्नू इस्टाम (४५) रा.मन्नेराजाराम, पापक्का बांडे सेडमेक (४५), लक्ष्मीबाई तलांडे (५०), कविता गंगाराम मडावी (२६), वैशाली चिंता मडावी (४०) आणि जपना श्यामराव मडावी (७) यांचा समावेश आहे.