आता काँग्रेसमध्ये जनतेच्या शिफारशीने मिळेल तिकीट : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 10:31 AM2021-11-02T10:31:13+5:302021-11-02T10:40:29+5:30
आता नेत्यांच्या नाही तर जनतेच्या शिफारशीने तिकीट मिळेल, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी गडचिरोलीतील काँग्रेस मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बजावले.
गडचिरोली : आता घरी बसून कामे करण्याचे दिवस गेले. जो लोकांमध्ये जाईल, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन त्यांच्यासाठी लढेल, त्यालाच संधी मिळेल. त्यामुळे आता नेत्यांच्या नाही तर जनतेच्या शिफारशीने तिकीट मिळेल, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी गडचिरोलीतील काँग्रेस मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बजावले. यावेळी राज्यातील पक्षाच्या नवीन सदस्यता नोंदणीचा शुभारंभ त्यांनी गडचिरोलीतून केला.
यावेळी नाना पटोले म्हणाले, राज्यात प्रदेश काँग्रेसमधील सर्वात युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या रुपाने गडचिरोलीला दिला आहे. आता पक्ष-संघटनेत युवा चेहऱ्यांना प्राधान्य देणार असून, निवडणुकांमध्येही ६० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींच्या अध्यक्षपदासाठी ठराव
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्षपद युवा नेते राहुल गांधी यांनाच द्यावे, असा ठराव यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. त्याला ना. विजय वडेट्टीवार यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मंचावरील सर्व पदाधिकारी आणि समोर उपस्थित सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी हात उंचावत आपले समर्थन जाहीर केले. राज्यात पहिल्यांदाच असा ठराव प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेस मेळाव्यात झाला.
या मेळाव्याला ओबीसी कल्याण तथा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, आ.अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी खासदार मारोतराव कोवासे, डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, रवींद्र दरेकर, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.