गडचिरोली : तीन जिल्ह्यातील १३ लोकांचा बळी घेणाऱ्या सिटी - १ या नरभक्षक वाघाला अखेर बेशुध्द करून पकडण्यात वनविभागाला यश आले. जवळपास आठवडाभरापासून वनविभागाच्या दोन टीम त्याच्या मागावर होत्या. आज (गुरुवारी) सकाळी झालेल्या या कारवाईने वन विभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
या वाघाने देसाईगंज जवळच्या वळूमाता प्रक्षेत्रातील एका गाईवर दोन दिवसापूर्वी हल्ला करून तिला मारले होते. त्यामुळे तो त्या ठिकाणी पुन्हा येणार याची खात्री असल्याने वनविभागाची ताडोबा येथून बोलावलेली चमू त्याच्यावर पाळत ठेवून होती. जवळच वाघासाठी शिकार म्हणून (बेट) दुसरी एक गायही ठेवली होती. अखेर आज सिटी वन त्या सापळ्यात अडकला आणि टप्प्यात येताच शूटर टीमने त्याच्यावर डार्ट डागला (बेशुद्धीचे इंजेक्शन) अशी माहिती वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. या वाघाला आता पिंजऱ्यात बंद करून ठेवले जाणार आहे.
गेल्या काही महिन्यात सिटी - १ या वाघाची दहशत ३ जिल्ह्यात पसरली होती. त्याने गडचिरोली जिल्ह्यात ६, भंडारा जिल्ह्यात ४ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३ जण अशा एकूण १३ लोकांवर हल्ले करून त्यांना ठार केले होते. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यास वन्यजीव विभागाने परवानगी दिली होती.