गडचिराेली : शेतीला लागूनच असलेल्या जंगलात इतर पाच लाेकांसाेबत आपापली गुरे चारत असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना गुरुवार ३ नाेव्हेंबर राेजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. गावापासून अगदी ३ किमी अंतरावर ही घटना असून गावातील हा तिसरा व्याघ्रबळी आहे.
सुधाकर उरकुडा भाेयर (५१) रा. राजगाटा चक असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुधाकर भाेयर यांच्याकडे एक बैलजाेडी आहे. ही बैलजाेडी ते नेहमीच आपल्या शेतीच्या परिसरात इतर चार ते पाच सहकाऱ्यांसाेबत चारायचे. गुरूवारी सकाळी ११ वाजता ते नेहमीप्रमाणेच आपल्या शेतशिवारात सहकाऱ्यांसाेबत बैल चारत हाेते.
बैल चरत असतानाच दुपारी २ वाजता वाघाने सुधाकर भाेयर यांच्यावर अचानक हल्ला केला. ते यावेळी गांगरले व ओरडले. परंतु वाघाने झडप घालून त्यांना पकडून थाेड्या अंतरावर नेले. काही वेळ मान जबड्यात पकडून ठेवली. याचवेळी साेबत असलेल्या गुराखी लाेकांनी आरडाओरड केली; तेव्हा वाघ तेथून पळून गेला. काही वेळ म्हणजेच ५ ते ६ मिनिटे सुधाकर हे जिवंत हाेते; परंतु थाेड्या वेळातच त्यांची प्राणज्याेत मालवली.
घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लगेच देण्यात आली. त्यांनी पंचनाम करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. सुधाकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व विवाहित मुलगी असा आप्तपरिवार आहे.