भीमदेव नागापुरे यांनी नवीन बैल खरेदी केेले हाेते. या बैलांना कळपात जाण्याचे वळण लागावे, यासाठी ते इतर तीन गुराख्यांसमवेत मागील काही दिवसांपासून बैल चराईसाठी नेत हाेते. मंगळवार, १४ ऑगस्टला त्यांनी आपली जनावरे अन्य तीन गुराख्यांसमवेत देलाेडा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक १०च्या जंगलात गावाच्या दक्षिण दिशेने ३ किमी अंतरावर नेले हाेते. बैल चारत असतानाच दुपारपर्यंत इतर तीन सहकाऱ्यांना नागापुरे यांचा काहीच अंदाज लागला नाही. दुपारनंतर त्यांनी गावात संपर्क साधून नागापुरे हे घरी परतले काय? अशी विचारणा केली; परंतु कुटुंबातील लाेकांनी ते परतले नाहीत, असे सांगितले. तेव्हा गुराख्यांच्या मनात वाघाबाबत संशय आला. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. सायंकाळी काही काळ शाेधमाेहीम राबविली. परंतु त्यांचा शाेध लागला नाही. बुधवारी सकाळी वनाधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी शेकडाेंच्या संख्येने कक्ष क्रमांक १०मध्ये शाेधमाेहीम राबविली असता भीमदेव नागापुरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. दाेन्ही पाय व ओटीपाेटापर्यंतचा पूर्ण भाग खाल्लेल्या स्थितीत हाेता. घटनास्थळी वडसाचे उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक वनसंरक्षक एम. एन. चव्हाण, पाेर्लाचे वन परिक्षेत्राधिकारी आर. बी. मडावी, वनपरिक्षेत्राधिकारी (वन्यजीव) आर. बी. इनवाते, परिविक्षाधीन सहाय्यक वनसंरक्षक (एफडीसीएम) अमोल नागा, मरेगावचे क्षेत्रसहाय्यक कैलाश अंबादे, वनरक्षक नितीन भोयर, नितीन गडपायले व वन कर्मचारी आदींनी पाेहाेचून पंचनामा केला.
बाॅक्स
११ महिन्यात १६ बळी, तर ५ जखमी
वडसा व गडचिराेली वन विभागांतर्गत मागील वर्षभरापासून वाघांचा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या ११ महिन्यात गडचिराेली तालुक्यात वाघाने आतापर्यंत १३ तसेच चामाेर्शी व मुलचेरा तालुक्यात बिबट्याने प्रत्येकी एकाचा बळी घेतला आहे. ११ महिन्यात एकूण १६ जणांचा बळी वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात गेला आहे. तसेच कुऱ्हाडी, दिभना, कळमटाेला, राजगाटा चेक येथील ४ जण वाघाच्या, तर आष्टी येथील एक मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे.