लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली व आरमाेरी तालुक्यात वाघांचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी गडचिराेली तालुक्यातील राजगाटा चेक येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यात ताे गंभीर जखमी झाला. तर गुरुवारी आरमाेरी तालुक्यातील नरचुली येथे गायींच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. प्रत्येक दिवशी नागरिक व पाळीव जनावरांवर वाघाचे हल्ले हाेत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीवन जुवारे(५५) रा. राजगाटा चेक असे जखमीचे नाव आहे. जुवारे हे इतर सहा शेतकऱ्यांसाेबत शेतशिवारात बैल चारत हाेते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडूपांमध्ये वाघ लपून बसला हाेता. जुवारे हे झुडुपांजवळ गेले असता वाघाने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात जुवारे हे जमिनीवर काेसळले. त्यानंतर पुन्हा वाघाने त्यांच्या छातीवर पंजा मारला. त्यामुळे जुवारे यांना पाठीवर व छातीवरही जखम झाली. वाघाने हल्ला करताच साेबत असलेल्या शेेतकऱ्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे वाघ पळून गेला व जुवारे यांचा जीव वाचला. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी राजगाटा चेक येथीलच शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र ताे व्यक्ती झाडावर चढल्याने त्याचे प्राण वाचले.
गायींनी वाघाला लावले पळवून
रांगी: आरमोरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नरचुली येथील पशुपालकांच्या गायी गुरुवारी दुपारी जंगल परिसरात चरत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने गायींच्या कळपावर हल्ला करून एका गायीला पकडले. यावेळी इतर गायींनी वाघावर जाेरदार हल्ला चढविला. यामुळे भयभीत झालेल्या वाघाने पळ काढला. ज्या गायीला वाघाने पकडले हाेते ती गाय गंभीर जखमी झाली. काही वेळाने ती मरण पावली.
याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मोका चौकशी केली. ज्या ठिकाणी गाय ठार झाली, त्या परिसरात कॅमेरा लावून ठेवण्यात आला आहे. वाघाची शिकार ठरलेली गाय नरचुली येथील जितेंद्र गेडाम यांच्या मालकीची आहे. वाघाचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.