गडचिरोली: उत्तर गडचिरोलीत व्याघ्रहल्ले वाढलेले असताना आता दक्षिण गडचिरोलीतही धोका वाढला आहे. ७ जानेवारीला शेतात कापूस वेचणी करताना महिलेवर वाघाने हल्ला करुन ठार केले. ही घटना अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ शिवारात घडली. जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र सुरुच असून पाच दिवसांतील हा दुसरा बळी आहे.
सुषमा देविदास मंडल (५५,रा. चिंतलपेठ ता. अहेरी) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या चिंतलपेठ शिवारातील जंगलालगतच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत होत्या. इतर महिलाही सोबत होत्या. सकाळ साडेअकरा वाजेच्या सुमारास दाट झुडूपात दडून बसलेल्या वाघाने सुषमा मंडल यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात सुषमा मंडल या जागीच मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या किंचाळण्याच्या आवाजाने इतर महिलांनी धाव घेतली तेव्हा वाघ दिसून आला.
महिलांनी आरडाओरड केल्यानंतर वाघ जंगलात निघून गेला. दरम्यान, गडचिरोली शहरापासून ७ किलोमीटरवरील वाकडी जंगलात ३ जानेवारीला सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या मंगलाबाई विठ्ठल बोळे (५५, रा.वाकडी ) यांच्यावर वाघाने हल्ला केला होता, यात त्यांचा मृत्यू झाला होता. उत्तर गडचिरोलीत वाघांची दहशत तर आहेच, पण दक्षिण गडचिरोलीतही वाघाने महिलेचा बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे.
नातेवाईकांनी व्यक्त केला रोष सुषमा मंडल यांच्या नातेवाईकांनी वनविभागाविरुध्द तीव्र रोष व्यक्त केला. वाघाचे वास्तव्य असल्याची सूचना वनविभागाने परिसरातील नागरिकांना द्यायला हवी होती, त्यामुळे लोक सतर्क राहिले असते, पण वनविभाग गाफील राहिला. त्यामुळे सुषमा मंडल यांना जीव गमवावा लागल्याची संतप्त भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. वनविभाग व पोलिस उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते, त्यामुळे नातेवाईकांसह गावकऱ्यांच्या भावनाही तीव्र होत्या.