जिल्ह्यात वाघ, हत्तींचा धुमाकूळ; पालकमंत्री, वनमंत्री कुठे आहेत? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:45 PM2023-11-27T12:45:26+5:302023-11-27T12:46:05+5:30

वनसंरक्षकांविरुद्ध ३०२ चा गुन्हा नोंदवा, काँग्रेसची तक्रार

Tigers, elephants swarm in Gadchiroli district; Where are the Guardian Minister, Forest Minister? Congress questioned | जिल्ह्यात वाघ, हत्तींचा धुमाकूळ; पालकमंत्री, वनमंत्री कुठे आहेत? काँग्रेसचा सवाल

जिल्ह्यात वाघ, हत्तींचा धुमाकूळ; पालकमंत्री, वनमंत्री कुठे आहेत? काँग्रेसचा सवाल

गडचिरोली : जिल्ह्यात हत्तीची व नरभक्षक वाघांच्या हल्ल्यात बळींचे सत्र सुरू असल्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. निष्पाप लोकांचे बळी जात आहेत; पण गडचिरोलीबद्दल कळवळा दाखविणारे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत, असा सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वनसंरक्षक व उपवनसंक्षकांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असून, याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात २६ नोव्हेंबरला तक्रार दिली आहे.

गडचिरोली तालुक्यातील हिरापूर व भगवानपूर येथे दोन शेतकऱ्यांना वाघाने ठार केल्याची घटना दि. २४ नोव्हेंबरला उघडकीस आली. त्यानंतर २५ नोव्हेंबरला मरेगावात धान पिकाचे संरक्षण करण्यास गेलेल्या मनोज प्रभाकर येरमे (३८) या शेतकऱ्याला रानटी हत्तीने पायाखाली चिरडून ठार केले. या घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले. २६ नोव्हेंबरला ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. यात मरेगावच्या घटनेला वनसंरक्षक व उपवनसंरक्षक जबाबदार असल्याचा दावा केला असून, याबाबत खुनाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, नेताजी गावतुरे, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, अब्दुल पंजवाणी, वामनराव सावसाकडे, भारत येरमे, दिवाकर निसार, दत्तात्रय खरवडे, संजय चन्ने, तालुकाध्यक्ष वसंत राऊत उपस्थित होते.

सध्या धान कापणी, मळणीची कामे वेगाने सुरू आहेत. अशावेळी वाघ व हत्तींनी उपद्रव सुरू केला आहे. रोज एक बळी जात आहे, अशा परिस्थितीत शासन व प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, हे दुर्दैवी आहे. अद्ययावत ड्रोन कॅमेरे नाहीत, प्रशिक्षित वनकर्मचारी नाहीत, त्यामुळे आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार आहात. यातून सरकारची असंवेदनशीलता समोर येत आहे.

- डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार व प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस

आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार?

जिल्ह्यात वाघ व हत्तींनी जगणे मुश्कील केले आहे. घराबाहेर पडताना मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वन विभागाने कुठलाही पुढाकार घेतला नाही. अद्ययावत ड्रोन कॅमेरे नाहीत, प्रशिक्षित वनकर्मचारी नाहीत, त्यामुळे आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार आहात, असा जळजळीत सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Tigers, elephants swarm in Gadchiroli district; Where are the Guardian Minister, Forest Minister? Congress questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.