विहिरगावातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा
मोहटोला/किन्हाळा : देसाईगंज तालुक्याच्या मोहटोला किन्हाळा परिसरातील विहिरगाव येथील अंतर्गत रस्ते पूर्णत: उखडले आहेत. मात्र या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गावातील बºयाच ठिकाणच्या नाल्या कचऱ्याने तुडूंब भरल्या असल्याने दुर्गंधी पसरत आहे. ग्रा.पं.ने नाल्यांचा उपसा करावा, अशी मागणी केली जात आहे.
अहेरीत रिकाम्या भूखंडामुळे घाण वाढली
अहेरी : आलापल्ली मार्गावर असलेल्या वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी रिकामे प्लॉट आहेत. सदर प्लॉट हे खोल असल्याने तिथे सांडपाणी साचते. परिणामी तिथे राहणाºया नागरिकांना दुर्गंधी, डास, घाण कचरा, अस्वच्छता यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी लहान मुले व मोठ्या माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नगर पंचायतीने त्यांच्यावर दंडाची कारवाई करावी.
डास व कीटकनाशक फवारणी करा
गडचिरोली : शहरातील बहुतांश वार्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचºयाचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व किटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील नाल्या तसेच डबक्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
शबरी घरकूल योजनेच्या लाभापासून नागरिक वंचित
गडचिरोली : आदिवासी नागरिकांसाठी शबरी घरकूल योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत गरजू व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जातो. मात्र आदिवासी भागातील अनेक नागरिक सदर योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.
कोत्तागुडम पुलाचे बांधकाम करा
अहेरी : व्यंकटापूर-अहेरी राज्य महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या कोत्तागुडाम पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना आवागमन करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलाच्या बांधकामात खंड पडला आहे. व्यंकटापूर परिसरातील नागरिकांना अहेरी येथे येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने या पुलाचे बांधकाम करावे.
मालेवाडा भागातील समस्या सोडवा
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे.
निसर्ग परिचय केंद्राचा विकास करा
आष्टी : चपराळा अभयारण्यातील हनुमान मंदिर प्रशांतधाम येथे वनविभागाच्यावतीने १९९६ मध्ये निसर्ग परिचय केंद्र बांधण्यात आले. मात्र सदर निसर्ग परिचय केंद्राची दुरवस्था झाली आहे. विकास करावा, अशी मागणी आहे.