लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील आरमोरी, रवी, चामोर्शी भागासह वैनगंगा नदीपलिकडील हळदा गावाच्या शिवारात वाघाने हैदोस घातल्याने मानव-वन्यजीव यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. यावर वेळीच तोडगा काढून योग्य त्या उपाययोजना करा, अशी सूचना ज्येष्ठ सहकार नेते तथा वनवैभव आणि आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक अरविंद पोरेड्डीवार यांनी केली आहे.सर्वाधिक वनाक्षेत्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक वन्यजीव आणि वनांचे संरक्षण करून ५० वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहात आहेत. मात्र अलिकडे वाघासारख्या वन्यजीवांचे नागरी वस्तीलगत आगमन वाढल्यामुळे नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू झाला आहे. जिल्ह्यातील नागरिक आलेले कटू प्रसंग आणि दु:खद प्रसंग पोटात ठेवून सहनशिलता दाखवत अनेक गोष्टींची वाच्यता करत नसले तरी त्यांच्यात असंतोष वाढत आहे. अनेक वेळा तर मनुष्यजीवापेक्षा वाघाचा जीव महत्वाचा असल्याप्रमाणे अतिशयोक्तीपर चित्र निर्माण केले जाते. अशा स्थितीत मानव आणि वन्यजीव दोघांचेही जीव वाचण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी पोरेड्डीवार यांनी केली आहे.हळदा या गावातील वाघाला पकडण्यात आल्यानंतर त्याला नरभक्षक घोषित करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने त्याला मारण्याच्या निर्णयास स्थगिती दिली. त्यामुळे त्या वाघाला बोर अभयारण्यात सोडण्यात आले. तेथील स्थानिक आमदारांनी विरोध केल्यानंतर ९ आॅक्टोबर रोजी वाघिणीला ठार मारण्याचा सुधारित आदेश काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा वन्यजीवप्रेमी डॉ.जेरिल बनाईत न्यायालयात गेल्याने ठार मारण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच पद्धतीने आरमोरीजवळील रवी गावाजवळून पकडलेल्या वाघिणीला चपराळा अभयारण्यात कॉलर आयडी लावून सोडण्यात आले. त्या वाघिणीने आष्टी परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर चामोर्शीजवळ विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. आता ब्रह्मपुरी वनक्षेत्रात वाघ-मानव संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत.वाघाला वाचविण्यासाठी प्रशासनाचा व वनविभागाचा कोट्यवधीचा खर्च होत आहे. प्रचंड नियमावलीच्या अधीन राहून वनाधिकाऱ्यांना आपले कौशल्य पणाला लावावे लागत आहे. त्यात थोडी चूक झाली तरी वन्यजीव प्रेमी, समाजसेवक, राजकीय मंडळींकडून वनविभागाला वेठीस धरले जात आहे. यातून प्रश्न संपण्याऐवजी प्रतिप्रश्न व समस्या निर्माण होत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या राहणीमानावर, दैनंदिन गरजा, शेती यावर होत आहे. हे टाळण्यासाठी वाघाचे अस्तित्व असणाऱ्या भागासाठी उपाययोजना करण्याचे अधिकार वनअधिकारी आणि तहसीलदारांना द्यावेत, अशी अपेक्षा पोरेड्डीवार यांनी व्यक्त केली.मग मृत शेतकऱ्यांनाही हवी श्रद्धांजलीनरभक्षक ठरवून ठार मारण्यात आलेल्या अवनी वाघिणीच्या मृत्यूला एक वर्ष झाल्याने ३ नोव्हेंबरला वन्यप्रेमींनी मेणबत्त्या जाळून तिला श्रद्धांजली वाहिली. परंतू त्या वाघिणीने रवी गावातील ज्या शेतकऱ्याला ठार केले त्यालाही श्रद्धांजली वाहिल्यास त्याच्या कुटुंबास सांत्वना मिळेल. याबाबत वन्यजीवप्रेमींनी जरूर विचारा करावा, अशी अपेक्षा सहकार नेते पोरेड्डीवार यांनी व्यक्त केली.
मानव-वन्यजीव संघर्षावर वेळीच तोडगा काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 6:00 AM
सर्वाधिक वनाक्षेत्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक वन्यजीव आणि वनांचे संरक्षण करून ५० वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहात आहेत. मात्र अलिकडे वाघासारख्या वन्यजीवांचे नागरी वस्तीलगत आगमन वाढल्यामुळे नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू झाला आहे. जिल्ह्यातील नागरिक आलेले कटू प्रसंग आणि दु:खद प्रसंग पोटात ठेवून सहनशिलता दाखवत अनेक गोष्टींची वाच्यता करत नसले तरी त्यांच्यात असंतोष वाढत आहे.
ठळक मुद्देअरविंद पोरेड्डीवार यांची सूचना : वाघांसोबत माणसांचे जीव वाचविण्यासाठी सांगितल्या उपाययोजना