आरमाेरी शहरातील एकूण १२ दुकानांना भेटी देत मुक्तिपथ तालुका चमूतर्फे १४ मे रोजी तंबाखूविक्रीचे दुष्परिणाम सांगत जनजागृती करण्यात आली. दरम्यान दोन दुकानांमध्ये आढळून आलेला तंबाखूजन्य पदार्थ नष्ट करण्यात आला. तसेच संबंधित व्यावसायिकाने हमीपत्रावर स्वाक्षरी करीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार नाही, असे वचन दिले. दरम्यान दोन दुकानांमध्ये मिळून आलेला ईगल, मजा, गुडाखू, ठवकर तंबाखू,सिगारेट असा तंबाखूजन्य पदार्थ नष्ट करण्यात आला. शहरातील दुकानदारांनी ‘या दुकानात तंबाखूजन्य पदार्थ मिळणार नाही’ अशा आशयाच्या हमीपत्रावर स्वाक्षरी करीत स्वतः दुकानासमोर ते पत्रक लावले.
कोरची शहरातील दुकानांना भेट देऊन संबंधित व्यावसायिकांना तंबाखू विक्रीचे दुष्परिणाम सांगत जनजागृती करीत असताना एक विक्रेता खर्रा घोटताना दिसून आला. मुक्तिपथ तालुका चमूने त्याच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले असून सोमवारी, नगरपंचायतच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कोरची शहरात मुक्तिपथ तालुका चमू दुकानांच्या भेटी घेत असताना एका विक्रेत्याकडे ईगल, खर्रा पन्नी, सुपारी, सिगारेट आदी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. जप्त करण्यात आलेला तंबाखूजन्य पदार्थ नगरपंचायतच्या ताब्यात देऊन सोमवारी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे
बाॅक्स
चिंगली येथे देशी दारू जप्त
धानोरा तालुक्यातील चिंगली गाव संघटनेच्या महिलांनी पुढाकार घेत अवैध देशी दारूसह विक्रेत्यास धानोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी महेश विश्वनाथ चौधरी या आरोपीवर ११ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंगली येथे अवैध दारूविक्री बंद होती. सध्या गावात ५ अवैध दारूविक्रेते सक्रिय आहेत. गाव संघटनेच्या महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्याची सूचना वारंवार देऊनही गावातील मुजोर दारूविक्रेत्याने चोरट्या मार्गाने आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. यामुळे गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करण्याचे ठरविले. गावातील गाव संघटन महिलांनी एका दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता १८ टिल्लू देशी दारू मिळून आली. या घटनेची माहिती मिळताच धानोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी दारूविक्रेत्यावर धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बीट अंमलदार पुराम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.