लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गेल्या १५ दिवसांपासून गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या बाजारात जिल्हा बाहेरून तसेच जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाजीपाल्यांचे भाव प्रचंड वधारले आहेत. विशेष म्हणजे २५ जून रोजी रविवारला गडचिरोली येथे भरलेल्या आठवडी बाजारात टमाटर ४० रूपये प्रतीकिलो दराने विकले जात होते. गेल्या सहा महिन्यातील हा सर्वाधिक भाव आहे. फुलकोबी २५ ते ३० रूपये किलो दराने तसेच कारले २५ ते ३० रूपये पाव या भावात विकले जात होते. हिरवी मिरची महाग झाली असून ६० रूपये किलो दराने विकली जात होती. वांगे ४० रूपये किलो, पत्ताकोबी ४० रूपये किलो, तोंडरी ३० रूपये किलो, बटाटे २० रूपये किलो दराने विकले जात होते. याशिवाय या आठवडी बाजारात पालकची भाजी व सांभाराचे भाव प्रचंड वाढले होते. गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या बाजारात संपूर्ण तालुक्यातून व शहरातून मोठ्या संख्येने ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी येतात. मात्र त्या तुलनेत भाजीपाल्याची अपेक्षित आवक रविवारच्या बाजारात न झाल्याने भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढल्याचे दिसून आले. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले. या बाजारात जांभळांची आवक प्रचंड वाढली होती. शिवाय रानभाज्याही विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
आठवडी बाजारात टमाटरचे भाव कडाडले
By admin | Published: June 26, 2017 1:03 AM