गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये बुधवारी रात्री व गुरूवारी सकाळी झालेल्या जोरदार वादळाने आणि अवकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले.
अहेरी येथे गुरूवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह वादळ व पावसाला सुरूवात झाली. यामुळे अनेक दुकानांची फलके तुटून पडली. अनेक दुकानांत तसेच घरात, आदिवासी विकास महामंडळ, ट्रेझरी कार्यालय येथे पावसाचे पाणी शिरले. जवळपास ४५ मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली. अहेरी बायपास मार्गावरील विजेची तार तुटून पडल्याने अहेरी शहराचा वीज प्रवाह खंडीत झाला. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेकांच्या चारचाकी व दुचाकी बंद पडल्या.
कमलापूर परिसरात घरावरील पत्रे, कवेलू, टिन उडाले. विद्युत तारांवर झाडे कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. जिमलगट्टा येथे अनेक घरांवर तसेच जंगलात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने देचलीपेठा, उमानूर भागातील वीज पुरवठा खंडीत झाला.एटापल्ली येथे सकाळी ११.३० ते १२ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. एटापल्ली तालुक्यातील काही शेतकरी आवत्या टाकतात. त्यामुळे आवत्यासाठी जमीन नांगरता येणार आहे.कोरची तालुक्यात गुरूवारी सकाळपासून पावसाच्या मध्यम सरी पडल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. कोरची तालुक्यातही बुधवारी रात्री काही भागात वीज गर्जनेसह पाऊस झाला. सिरोंचा येथे बुधवारी रात्री व गुरूवारी दुपारी १२ ते १.३० वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाला. रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाल्याने संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली.