दामरंचा येथील काम : साहित्य पोलीस ठाण्यातकमलापूर : येथून २२ किमी अंतरावरील दामरंचा गावाच्या परिसरात २३ गावे आहेत. या सर्व गावांना संपर्क क्षेत्रात आणण्याच्या उद्देशाने भ्रमणध्वनीचे काम एक वर्षापूर्वी हाती घेण्यात आले होते. ते अजुनही पुर्णत्वास आले नाही. या कामासाठी आणलेले साहित्य धूळ खात पडून आहे. दामरंचा परिसरात संड्रा, कोयागुडम, चितारवेलू आदी गावे आहेत. या परिसरात दुरध्वनी व भ्रमणध्वनीची कोणतीही सेवा नाही. अनेक शासकीय कर्मचारी व अधिकारी या भागात राहतात. त्यांना आपल्या परिवाराशी संपर्क ठेवण्यास अडचणी येतात. गंभीर आजाराच्या रूग्णाला रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिकाही फोनवर बोलविता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन भारत संचार निगमच्या वतीने या भागात मनोरा उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. एक वर्षापूर्वी यासाठी साहित्य मागविण्यात आले होते. ते काम अजूनही सुरू झालेले नाही. पोलीस ठाण्याच्या आवारात हे साहित्य पडून आहे. पुढील महिन्यात हे काम सुरू होईल, अशी आशा करताकरता वर्षाचा कालावधी उलटला. परंतु काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेऊन भारत संचार निगमने मनोरा उभारणीचे काम तत्काळ हाती घ्यावे, अशी मागणी आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात मनोरा उभारून या परिसरांना संपर्क यंत्रणेशी जोडा, असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. त्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मनोरे उभारण्याचे काम सुरू झाले. (वार्ताहर)
टॉवर उभारणीचे साहित्य धूळखात पडून
By admin | Published: May 18, 2016 1:40 AM